58 वॉर्डांच्या आरक्षणात कोणताच बदल नाही
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेची वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण नव्याने करण्याचा आदेश धारवाड न्यायालयाने बजावला होता. मात्र सदर आदेशाला डावलून नगर विकास खात्याने वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवून केवळ आरक्षण नव्याने जाहीर केले होते. तात्कालिक आरक्षणाबाबत शहरवासियांनी आक्षेप नोंदविला होता. पण आक्षेप निकालात काढून नगरविकास खात्याने अंतिम आरक्षण जाहीर केले आहे. कोणत्याच आरक्षणात बदल न करता आरक्षण जाहीर करण्यात आल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
पुनर्रचना व आरक्षणाला माजी नगरसेवकांनी आक्षेप घेऊन धारवाड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर आरक्षण व पुनर्रचना रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. सदर आरक्षण चुकीचे असल्याचे मान्य करून नव्याने पुनर्रचना व आरक्षण जाहीर करण्याचे प्रतिज्ञापत्र धारवाड उच्च न्यायालयात सादर केले होते. मात्र सदर प्रतिज्ञापत्राचा विसर नगरविकास खात्याला पडला असून 2018 ची पुनर्रचना कायम ठेवून आरक्षण जाहीर करण्यात आले होते. यापूर्वी नगरविकास खात्याने अंतिम आरक्षणाबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी अवधी दिला होता. असंख्य नागरिकांनी आक्षेप नोंदविले होते. पण ते फेटाळून तात्कालीक आरक्षण कायम करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्याची तयारी केलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. अनगोळमधील पाचही वॉर्डमधील आरक्षण महिलासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. याबाबतही आक्षेप नोंदविण्यात आला होता. पण तो फेटाळण्यात आल्याने 58 वॉर्डांच्या आरक्षणात कोणताच बदल करण्यात आला नाही.
नगरविकास खात्याने जाहीर केलेल्या 58 वॉर्डांचे अंतिम आरक्षण
