विंग कमांडरच्या मुक्ततेची इनसाइड स्टोरी : पंतप्रधान मोदींच्या संदेशाने हादरला होता पाकिस्तान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय वायुदलाचे शूर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान दोन वर्षांपूर्वी 27 फेब्रुवारी रोजीच भारतीय सीमेत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पिटाळून लावत पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचले होते. भारताच्या प्रचंड दबावामुळे एका दिवसातच पाकिस्तानला त्यांची मुक्तता करण्याची घोषणा करणे भाग पडले होते. तेव्हा पाकिस्तानींच्या ताब्यात असलेल्या अभिनंदन यांची रक्ताळलेली छायाचित्रे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विंग कमांडरला तत्काळ सोडण्याचा स्पष्ट संदेश पाकिस्तानला पाठवला होता. ‘आमच्या शस्त्रास्त्रांचा साठा दिवाळीसाठी ठेवलेला नाही’ असा संदेश मोदींनी पाकिस्तानला दिला होता, असे आता समोर आले आहे.
28 फेब्रुवारी 2019 रोजी पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत अभिनंदन यांच्या मुक्ततेची घोषणा करावी लागली होती. 1 मार्च रोजी अभिनंदन अटारी सीमेतून मायदेशात परतले होते. भारतीय वैमानिकाची जखमी अवस्थेतील आणि त्यांना कैद करणाऱयांची हसतानाची छायाचित्रे तसेच चित्रफिती पाहून पंतप्रधान मोदींनी रिसर्च अँड ऍनालिसिस विंग (रॉ) प्रमुख अनिल धस्माना यांना अभिनंदन यांची तत्काळ मुक्तता न केल्यास गंभीर परिणाम होतील असा संदेश पाकिस्तानला पाठविण्यास सांगितले होते. ‘आमच्या शस्त्रास्त्रांचा साठा दिवाळीसाठी नाही’ असा मोदींचा पाकिस्तानसाठी संदेश होता.
रॉ प्रमुखांचा फोन, पाकिस्तानात खळबळ
रॉ प्रमुख धस्माना यांनी तत्कालीन आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल सैयद आसिम मुनीर अहमद शाह यांना फोन करून स्पष्ट शब्दांत पाकिस्तानला भारताचा संदेश ऐकविला होता. संदेश अत्यंत ‘स्पष्ट आणि आक्रमक’ असल्याने मुनीर गारठूनच गेले होते. काय इच्छितो हे आता पाकिस्तानवरच आहे. वैमानिकाला खरचटलं तरीही गंभीर परिणाम भोगावे लागतील. अभिनंदन यांना कुठलेही नुकसान न होता तत्काळ सोडण्यात यावे, असे रॉ प्रमुखांनी बजावले होते. या फोन कॉलनंतर पाकिस्तानात खळबळ उडाली होती.
अमेरिकेतही अस्वस्थता
भारताने पूर्ण तयारी केली होती. सैन्याला राजस्थान सेक्टरमध्ये पृथ्वी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना सज्ज ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. पाकिस्तानात खळबळ उडाली होती, तर अमेरिकेच्या प्रशासनातही अस्वस्थता होती.
आयएसआय प्रमुखांचे गुप्त पत्र
तत्कालीन आयएसआय प्रमुख मुनीर यांनी 28 फेब्रुवारी रोजी सकाळी रॉ प्रमुखांना एक ‘गुप्त पत्र’ लिहिले ज्यात अभिनंदन यांच्या मुक्ततेच्या निर्णयाची माहिती देण्यात आली होती. जून 2019 मध्ये मुनीर यांना आयएसआय प्रमुख पदावरून हटविण्यात आले होते. त्यांच्या जागी कट्टरतावादी लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना हे पद देण्यात आले.
अभिनंदन यांची अफाट कामगिरी
27 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाईक्षेत्रात घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना भारतीय लढाऊ विमानांनी पिटाळून लावले होते. या दरम्यान विंग कमांडर अभिनंदन यांनी स्वतःच्या मिग-21 बायसन विमानाद्वारे पाकिस्तानचे एफ-16 लढाऊ विमान पाडविले होते. यादरम्यान अभिनंदन यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले, ज्यानंतर त्यांना पीओकेत उतरावे लागले होते, तेथे पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेतले होते.