विविध मंदिरांतून पार पडले धार्मिक कार्यक्रम

प्रतिनिधी /बेळगाव
शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त शहर परिसरातील विविध शिवमंदिरातून धार्मिक कार्यक्रम झाले. शहर परिसरातील महादेव मंदिरातून पूजा, अभिषेक, आरती, तीर्थप्रसाद व पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मंदिरांतून गर्दी वाढली होती.
दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कपिलेश्वर मंदिरात कपिलेश्वर विश्वस्त मंडळातर्फे रात्री अभिषेक घालण्यात आला. तसेच मंदिरात परंपरा जपत त्रिकाल पूजा झाली. रात्री 8 वाजता पालखी प्रदक्षिणेनंतर महाआरती झाली. भक्तांच्या स्वागतासाठी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
खडे बाजार येथील संतशिरोमणी नामदेव महाराज मंदिरात नामदेव देवकी समाजातर्फे शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त विठ्ठल मूर्तीला महादेवाच्या रूपातील विशेष पूजा बांधण्यात आली होती. यावेळी काकडआरती, पूजा अभिषेक, आरती व तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरातही विविध धार्मिक झाले.
कॅम्प मिलिटरी महादेव मंदिरात पूजा, अभिषेक, आरती तर कॅम्प येथील बिस्किट महादेव मंदिरात पूजा, रूद्राभिषेक, आरती आदी धार्मिक कार्यक्रम झाले. पाटील गल्ली येथील शनैश्वर मंदिरात पिठोरी अमावस्येनिमित्त तैलाभिषेक, होम, शनिशांती, नवग्रह शांती, जप, तैलदान, रूद्राभिषेक, लघुरूद्र आदी कार्यक्रम झाले. गणेशपूर स्वयंभू मंदिर, काकतीवेस येथील शंभू मंदिर आदी ठिकाणी धार्मिक कार्यक्रम झाले.
यंदा देखील महाप्रसाद रद्द
शेवटच्या सोमवारनिमित्त शहर परिसरात विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जायचे. मात्र मागील वर्षापासून कोरोनामुळे महाप्रसाद रद्द करण्यात आले आहे. यंदा देखील अनेक ठिकाणचे महाप्रसाद रद्द करण्यात आले.