विशेष प्रतिनिधी/ देवरूख
संगमेश्वर तालुक्यात आजवर बिबटयांचा मोठा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे पटटेरी वाघ दिसल्याच्या घटनाही घडल्या आहेत मात्र याच जातीतील दुर्मिळ असलेल्या ब्लॅक पँथरचे वास्तव्य तालुक्यात असल्याचे एकही उदाहरण आजपर्यंत पाहायला मिळाले नव्हते. अखेर याची कसर भरून निघाली असून संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे गावात याचे दर्शन घडले आहे. नुकताच त्याचा या भागात वावर असल्याचा व्हिडीओ ग्रामस्थांनी सोशल मिडियावर शेअर केला. वनविभागाने त्याला दुजोरा दिला. त्याच्या हालचालांवर लक्ष ठेवण्यासाठी लवकरच तेथे कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले.
यापूर्वी दूरदर्शनवर गाजलेल्या जंगल बुक या चिमुकल्यांच्या मालिकेत बगीरामुळे ब्लॅक पॅन्थर म्हणजे काय हे सर्वश्रुत झाले आहे. जिल्हय़ात त्याचे वास्तव म्हणजे वन विभागाला आणि जिल्हावासीयांना अप्रूपच. पट्टेरी वाघाबाबतही यापुर्वी दिसल्याची चर्चा सुरु होती. मात्र वनविभागाने ती अफवा असल्याचे सांगितले. चांदोली अभयारण्यात पट्टेरी वाघ आहे. परंतू जिल्हय़ात नाहीत. ब्लॅक पॅथरबाबतही तसेच होते. जिल्हय़ात बिबटय़ांची संख्या प्रचंड वाढली आहे, त्यामुळे जंगलातील त्याचा अधिवास कमी होवून ते मानवी वस्तीत शिरत असल्याची अनेक उदाहरणे जिल्हय़ात पहायला मिळतात. ब्लॅक पॅथर ही बिबटय़ाची जात आहे. मात्र, त्याचा रंग पुर्ण काळा म्हणून तो विशेष आणि दुर्मीळ आहे.
यापुर्वी राजापूर तालुक्यात विहिरीत पडलेल्या ब्लॅक पॅन्थरला जीवनदान देण्यात आले होते. त्यानंतर गुहागरमध्ये एका ब्लॅक पॅन्थरचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. आता संगमेश्वर तालुक्यात बगीराचा वाढता वावर चर्चेचा विषय बनला आहे. कोडीवरे येथील जंगलात ब्लॅक पॅन्थर अनेकांना दिसला. ग्रामस्थांनी त्याचा व्हिडीओ केला असून तो वनविभाग आणि सोशल मिडियावर शेअर केला आहे. याबाबत रत्नागिरी वन अधिकाऱयांशी चर्चा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. गुहागर, राजापूरनंतर आता संगमेश्वर तालुक्यातही ब्लॅक पॅन्थर आढळून आला ही पर्यावरण प्रेमींना आनंदाची बाब आहे.