अपशिंगे मंडलाची जाणीवपूर्वक डोळेझाक ?
प्रतिनिधी / नागठाणे
गेल्या काही महिन्यांपासून मत्यापुर ते अतीत दरम्यान वाहणाऱ्या उरमोडी नदीपात्रात वाळूमाफियांनी अक्षरशः धुडगूस घातला असून पात्रातून हजारो ब्रास वाळू वाळूमाफियांनी अवैधरित्या काढली आहे.जेसीबी व ट्रकच्या माध्यमातुन रात्रीच्या अंधारात येथे वाळू काढली जात असूनही या घटनेची साधी खबर महसूल तसेच अपशिंगे मंडळाच्या कर्मचाऱ्यांना होत नसल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.या अवैध उपश्यामुळे शासन लाखो रुपयांचा रॉयल्टीला मुकले असून महसूल विभागाच्या वरदहस्तामुळेच वाळूमाफियांचे फावले गेले असल्याची जोरदार चर्चा सध्या परिसरात होत आहे.

जिल्ह्यात वाळू उपश्याला बंदी असल्याने अनेक ठिकाणी चोरटी वाळू काढली जात आहे.नागठाणे परिसरातील गावांमधून वाहणारी उरमोडी नदीही वाळूमाफियांचा रडारवर नेहमीच असते.कृष्णा नदीपाठोपाठ उरमोडी नदीच्या वाळूलाही बांधकाम क्षेत्रात मोठी मागणी आहे.त्यामुळे उरमोडी नदीतही चोरटा वाळू उपसा होत असतो.
सध्या मत्यापुर ते अतीत दरम्यान वाहणाऱ्या उरमोडी नदीच्या नदीपात्रातून गेल्या काही महिन्यांपासून वाळूमाफियांनी मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध वाळू उपसा केला आहे.विशेष म्हणजे येथे चक्क जेसीबीचा वापर करून ट्रकच्या माध्यमातून हजारो ब्रास वाळू चोरून काढली गेली आहे.रात्रीच्या अंधारात सुरू होणारा हा वाळू उपसा पहाटे पर्यंत चालत असल्याची माहिती समोर येत असून या अवैध वाळू उपश्याची साधी माहितीही अपशिंगे मंडळाच्या मंडलाधिकारी,तलाठी अथवा गावातील कोतवाल यांना समजत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला वाळू उपसा हा अपशिंगे मंडलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच बिनबोभाटपणे झाला असल्याची जोरदार चर्चा सुरू असून या गंभीर बाबीची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन वाळूमाफियांच्या मुसक्या आवळाव्यात व या अवैध वाळूउपश्याला छुपा पाठींबा देणाऱ्या अपशिंगे मंडलातील कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.
