मटका खेळून अनेकांची घरे मंदीत : बंद टपऱया झाले अड्डे : शहरातील अनेक ठिकाणी खुलेआम मटका : मटकावाल्यांचे सारखेच ’पुनश्च हरिओम’
प्रतिनिधी / सातारा
‘लागला तर लागला’ असे करत पाच रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंत मटका खेळणाऱयांमध्ये सर्वसामान्यांपासून ते व्यापाऱयांपर्यंत सर्वजण मटका लावत असतात. अशा मटका खेळणाऱयांची चांगली सुविधा व्हावी या उद्दात हेतूने साताऱयातील मटकाकिंग शहर व परिसरात आपले पंटर नेमून हा व्यवसाय खुलेपणाने अन दिलखुलासपणे चालवत आहेत. एकीकडे कोरोनामुळे सामाजिक आर्थिक घडी विस्कटली असताना मटकेवाल्यांचा व्यवसाय तेजीत असून यामुळे मटका खेळून अनेकांची घरे मंदीत जात आहे. पोलीस दलाकडून कारवाया सुरुच असतात मात्र यामध्ये कडक शिक्षेची तरतूद नसल्याने मटकावाले जामीन घेवून नेहमी प्रमाणे ’पुनश्च हरिओम’ म्हणून बिनदिक्कतपणे हा अवैध व्यवसाय सुरुच ठेवत आहेत.
कोरोना स्थितीत फक्त किराणा माल व भाजी व अत्यावश्यक वस्तूंचे व्यवसाय तेजीत होते. इतर सर्व व्यापारी वर्गाला हातावर हात मारुन बसण्याची वेळ लॉकडाऊनच्या काळात आली होती. दुसरीकडे कोरोनाचा विस्फोट झाल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. त्यानंतर अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यावर अवैध व्यवसायिक अनलॉक झालेत. अनलॉक प्रक्रियेनंतर पोलिसांनी सातत्याने सातारा शहर व परिसरात मटका अड्डय़ांवर कारवाया करत घटनास्थळी जो पंटर असतो त्याच्यावर सीआरपीसी अन्वये कारावाया केल्यात. त्यांच्या ताब्यातील रोख पैसे व जुगाराचे साहित्यही जप्त केले आहे.
या कारवायांमध्ये अड्डा चालवणाऱया अड्डामालकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र अट्टल मटका व्यावसायिकांना पोलीस कारवाईचा प्रत्यक्ष सामना करावा लागलेला नाही. मध्यंतरी तालुका पोलीस ठाण्यात मटकाकिंग समीर कच्छीवर चांगलाच नेम धरला होता. मात्र तो देखील आता त्याचे अड्डे चालवतच आहे. तर गुरुवार परजावरील मटकाकिंगही चांगलेच ऍनलॉक झाले आहेत. जुगार, मटक्यावरील कारवाया हा आता रुटीनचा विषय झाल्यासारखे आहे.
अड्डा चालवणारे निवांत आपल्या घरात बसून असतात. बेरोजगार मुले, बेरोजगार माणसे त्यांच्याकडे येतच असतात. त्या माणसांनाही उद्योग नसल्याने मग चला मटका पंटर बनून स्वतःचे घर चालवूया, असे म्हणत प्रत्यक्ष फिल्डवर असलेल्या अनेक टपऱया, आडोशांवर दिवसभर अड्डेमालकांसाठी पैसे गोळा करुन चिठ्ठय़ा वाटपाचा कार्यक्रम प्रामाणिकपणे पार पाडतात. पोलिसांची कारवाई झालीच एकतर अटक व नंतर अन्यथा एखादी नोटीस हातात पडली विषय संपतो.
मटका खेळणारे आहेत म्हणून
कोणताही अवैध व्यवसाय हा त्याला मिळणाऱया प्रतिसादावर टिकतो. मटका व्यवसायाची कीड वर्षानुवर्षे तशीच लागलेली आहे. या अवैध किडीला कधीच लॉकडाऊन लागलेला नाही. गरिबातल्या गरिबापासून ते श्रीमंत असलेल्या व्यापारी, शासकीय कर्मचाऱयांना देखील मटका खेळण्याची प्रचंड आवड असल्याने हे दृष्टचक्र थांबत नाही. हे थांबवण्यासाठी अड्डामालकांच्या कायदेशीर मुसक्या आवळून त्यांच्यावर मोक्याची कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
बंद टपऱया झाले मटका अड्डे
सध्या सातारा शहरात कोरोना स्थितीमुळे अनेक टपऱया बंद आहेत. अद्यापही त्यांचे व्यवसाय सुरु झाले नाहीत. त्यामुळे अशा बंद टपऱयांवर कल्याण, राजधानी, मुंबई असे मटक्याचे निकाल जाहीर झालेले फलक लटकत आहेत. दिसला आडोसा की झाला मटका अड्डा. पेन, कागदाचे तुकडय़ावर अनेकांच्या संसारांची होळी करणारी ही ठिकाणे सध्या राजवाडा, गुरुवार परज, जुना मोटार स्टँड, सातारा बसस्थानक परिसर, राधिका चौकातील बहुतांशी टपऱया, बाँबे रेस्टारंट चौक, गोडोली साईबाबा मंदिर परिसरासह मोळाचा ओढा, कोडोली, गोडोली, खेड, अजंठा चौक परिसरात राजरोजपणे सुरु आहेत.
महिलांचे डोळे दलाल मॅडम यांच्यावर
अनेकांच्या घरात या मटक्याने दिवाळे काढलेय. मात्र अनेक बहाद्दरांचा मटक्याचा नाद काही सुटत नाही. मग सातत्याने घरात भांडणे, पोराबाळांची आबाळ अन् त्यात कोरोनाचे ग्रहण. अशा स्थितीत अडकलेल्या समाजाला या मटकावाल्यांच्या जाळय़ातून बाहेर काढण्यासाठी साताऱयातील हे अड्डे पुन्हा सुरुच होवू नयेत अशी धडक कारवाई करण्याची गरज आहे. समीर शेख यांनी धडाका लावला होता मात्र तरीही पुन्हा तेजीत सुरु असलेला हा अवैध व्यवसाय नवीन आलेल्या सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल मॅडम मोडीत काढणार का? याकडे महिलावर्गाचे लक्ष आहे.