वृत्तसंस्था/ जेदाह (सौदी अरेबिया)
आगामी एफआयबीएच्या विश्वचषक पुरुषांच्या बास्केटबॉल स्पर्धेसाठी येथे सुरू असलेल्या आशियाई पात्र फेरीच्या स्पर्धेतील गुरुवारच्या सामन्यात सौदी अरेबियाने भारताचा 85-54 अशा बास्केटस्ने पराभव केला.
सदर सामना येथील किंग अब्दुल्ला स्पोर्टस् सिटीच्या मैदानावर खेळविण्यात आला. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील ई गटातील हा दुसऱया फेरीतील सामना होता. या सामन्यात भारतातर्फे सेजिन मॅथ्यूने 10 गुण तर सौदी अरेबियाच्या हझिम बादेर अलजोहर तसेच खलिद अब्देल गब्बर यांनी प्रत्येकी 16 गुण नोंदविले. या सामन्यात पहिल्या दहा मिनिटातच भारतावर 19-14 अशी आघाडी मिळवली होती. समान्याच्या मध्यंतरापर्यंत सौदी अरेबियाने भारतावर 38-28 अशा 10 गुणांची आघाडी मिळवली होती. सामन्यांच्या उत्तरार्धात सोदी अरेबियाचा खेळ अधिकच दर्जेदार झाला. या सामन्यातील शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत सौदी अरेबियाने 19 तर भारताने केवळ 8 गुण मिळवले. 2023 साली होणाऱया विश्वचषक बास्केटबॉल स्पर्धेसाठी पात्र फेरीची स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला दुसऱया फेरीतील तीन सामने हुकले. त्याचप्रमाणे पहिल्या फेरीतील चारही सामन्यात भारताने सहभाग दर्शविला नाही. आता भारताचे तीन सामने बाकी आहेत. भारताचा पुढील सामना येत्या शनिवारी लेबेनॉनबरोबर बैरुतमध्ये खेळविला जाईल. या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय बास्केटबॉल संघाला यापूर्वी एकदाही प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळवता आले नाही.