खानापूर-चिकोडी तालुका रुग्णालयातही असणार सुविधा : दिल्ली येथील कंपनीला बजावला आदेश
जे. अब्बास मुल्ला / हुबळी
10 जिल्हे आणि 30 तालुका रुग्णालयांमध्ये एक्सक्लुझिव्ह ऑक्सिजन प्लांट निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने अखेर पुढाकार घेतला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे हे प्रमाण देशात सर्वाधिक ठरणार आहे.
दिल्ली येथील कंपनीकरिता ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्यासाठी आदेश बजावला आहे. या प्रकल्पांचे काम पुढील काही दिवसांमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. महिन्याभरात या प्रकल्पांचे काम पूर्ण करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे. या प्रकल्पांमध्ये 400 ते 500 लीटर ऑक्सिजन प्रतिमिनिट प्राप्त करण्याच्यादृष्टीने आधुनिक यंत्रसामग्री वापरली जाणार आहे. या प्रकल्पांकरिता राज्य सरकार 15 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करणार आहे.
500 एलपीएम व्हीएसए टेक्नॉलॉजी ऑक्सिजन जनरेटर प्लांट्स स्थापन करण्यासाठी 10 जिल्हा रुग्णालयांची यापूर्वीच ओळख पटविण्यात आली आहे. बेंगळूर विभागात के. सी. जनरल हॉस्पिटल, मल्लेश्वरम, दावणगेरे, कोलार आणि तुमकूरमधील जिल्हा रुग्णालयात हे प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहेत. म्हैसूर विभागात चिक्कमंगळूर, उडुपी आणि म्हैसूर येथेही ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहे. बेळगाव विभागात बागलकोट आणि हावेरी जिल्हा रुग्णालयात ही सुविधा निर्माण केली जाणार आहे. कलबुर्गी विभागात यादगीर रुग्णालयातही ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार आहे.
तालुका रुग्णालयांनाही 390 एलपीएम पीएसए टेक्नॉलॉजी ऑक्सिजन जनरेटर प्लँट्स सज्ज करण्यात येणार आहेत. बेंगळूर विभागातील 9, म्हैसूर विभागातील 8, बेळगाव विभागातील 9 तालुका रुग्णालयांचा यात समावेश आहे. कलबुर्गी विभागातील 5 तालुका विभागांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. बेळगाव विभागातील खानापूर आणि चिकोडीमध्ये हा प्रकल्प स्थापन होणार आहे. कारवार जिल्हय़ातील शिर्सी आणि भटकळ रुग्णालयांची याकरिता निवड करण्यात आली आहे.
कामाचा आदेश जारी
व्हॅक्यूम स्विंग ऍडसॉरप्शन (व्हीएसए) प्रोसेसद्वारे ऑक्सिजन निर्माण केल्याने अनेक समस्या निकालात निघतात. ऑक्सिजन पीएसए जनरेटर्स ऑक्सिजन(ओ 2) कम्प्रेस्ड एअरमधून प्रेशर स्विंग ऍडसॉरप्शन टेक्नॉलॉजीचा वापर करत वेगळा करतात. या प्रक्रियेत हा वायू झिओलाइट मॉलिक्युलर सिव्हमधून जात असतो. ऑक्सिजनच्या पुरवठय़ाप्रकरणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा व तालुका रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लँट निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता कामाचा आदेश काढला असून ठेकेदाराला महिन्यात काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर दर मिनिटाला 400 ते 500 लीटर ऑक्सिजन तयार करतील, यातून ऑक्सिजन पुरवठय़ाचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार असल्याचे उद्गार आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. के. व्ही. त्रिलोक चंद्रा यांनी काढले आहेत.