चीनमधून होतेय कांद्याची तस्करी
वृत्तसंस्था/ मनीला
फिलिपाईन्समध्ये कांद्याचे दर आता गगनाला भिडले आहेत. तेथील कांद्याची किंमत चिकनपेक्षा जवळपास 3 पट अधिक झाली आहे. कृषी विभागानुसार 1 किलो चिकनची किंमत 325 रुपये आहे, तर एक किलो कांद्यासाठी 900 रुपये खर्च करावे लागत आहेत. वाढत्या किमती आणि अधिक मागणीमुळे कांद्याची तस्करी देखील सुरू झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी फिलिपाईन्सच्या कस्टम अधिकाऱयांनी 3 कोटी रुपयांचा कांदा जप्त केला होता. हा कांदा चीनमधून पेस्ट्रीच्या डब्यांमध्ये लपवून आणला जात होता. तत्पूर्वी डिसेंबरमध्ये कस्टम अधिकाऱयांनी 2.5 कोटी रुपयांचा कांदा जप्त केला होता. हा कांदा कपडय़ांमध्ये लपवून आणला जात होता.

जप्त करण्यात आलेला कांदा विकण्याच्या पद्धती शोधत आहोत. यामुळे कांद्याची कमतरता पूर्ण करता येईल असे फिलिपाईन्सचे अध्यक्ष फर्डिनेंड मार्कोस ज्युनियर यांनी म्हटले आहे. अध्यक्ष मार्कोस यांनी चालू आठवडय़ात 21 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. परंतु हा कांदा 27 जानेवारीपर्यंत फिलिपाईन्समध्ये पोहोचणार आहे. तर देशात फेब्रुवारीत कांद्याचे पीक उपलब्ध होणार असून त्यानंतर किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.
फिलिपाईन्सच्या लोकांच्या आहारात कांदा महत्त्वाचा हिस्सा आहे. तेथे दर महिन्याला 20 हजार मेट्रिक टन कांदा फस्त केला जातो. मागील वर्षी आलेल्या अनेक चक्रीवादळांमुळे अब्जावधी रुपयांच्या कांद्याचे पीक नष्ट झाले होते. कांदय़ाच्या वाढतय किमतींमुळे फिलिपाईन्समधील महागाई दर 14 वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे.
फिलिपाईन्समध्ये कांद्याच्या किमीत जगात सर्वाधिक आहेत. तेथील खासदारांनी आता कांद्याची तस्करी रोखण्यासाठी कृतिदल स्थापन करण्याची मागणी केली आहे.