के. आर. शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा : के.आर. शेट्टी संघाचा क्वालिफायर फेरीत प्रवेश

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित दुसऱया के. आर. शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्सने साईराज वॉरियर्सचा 4 गडय़ांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर एलिमिनेटर सामन्यात पोतदार के. आर. शेट्टी संघाने साई स्पोर्ट्स संघाचा धावांच्या सरासरीवर पराभव करून दुसऱया क्वालिफायर फेरीत प्रवेश केला आहे. वैष्णव संघमित्र (हुबळी टायगर्स), रब्बानी दफेदार (के. आर. शेट्टी) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने 20 षटकात सर्व बाद 117 धावा केल्या. नरेंद्र मांगोरेने 45, सुधन्वा कुलकर्णीने 24, किसन मेघराजने 14 धावा केल्या.
अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्सतर्फे वसंत शहापूरकरने 13 धावात 3, फरहान पाटीलने 23 धावात 2, आनंद कोनूर, संतोष सुळगे पाटील व ज्ञानेश होनगेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने 18.3 षटकात 6 बाद 118 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. वैष्णव संघमित्रने 41, सर्फराज मुल्लाने 20, वसंत शहापूरकरने 14, परिक्षित उक्कुंडीने 10 धावा केल्या. साईराजतर्फे ओंकार वेर्णेकरने 20 धावात 3, नरेंद्र मांगोरे व शुभम गौंडाडकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुपारी खेळविण्यात आलेल्या एलिमिनेटर सामन्यात साई स्पोर्ट्स संघाने 19 षटकात सर्व बाद 100 धावा केल्या. राहुल नाईक व मिलिंद चव्हाण यांनी 2 षटकार व 3 चौकारासह प्रत्येकी 25 तर पार्थ पाटीलने 13 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे रब्बानी दफेदारने 26 धावात 5, डॉमनिक फर्नांडिसने 16 धावात 2 तर वैभव कुरूबागी, स्वयम अप्पण्णावर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी संघाने 9.5 षटकात 3 गडी बाद 54 धावा केल्या होत्या. यावेळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबविण्यात आला. त्यामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार के. आर, शेट्टी संघाला विजयी घोषित करण्यात आले. प्रसन्न पाटील व वैभव कुरूबागी यांनी प्रत्येकी 17, केतज कोल्हापुरेने 15 धावा केल्या. साई स्पोर्ट्सतर्फे पुनीत दिक्षितने 19 धावात 2 व आर्यन उपाध्येने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अमान राजू शेठ, सुगी सुधाकर शेट्टी, सुधाकर शेट्टी, यतिनजी शेट्टी, रणजित शेट्टी, सनद शेट्टी, केवल शेट्टी यांच्याहस्ते सामनावीर वैष्णव संघमित्र, इम्पॅक्ट खेळाडू वसंत शहापूरकर, सर्वाधिक षटकार शुभम गौंडाडकर, उत्कृष्ट झेल परिक्षित उक्कुंडी यांना तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे सुकेश शेट्टी, गंगाधर शेट्टी, सेहजाद पठाण, वासिम धामणेकर यांच्या हस्ते सामनावीर रब्बानी दफेदार व इम्पॅक्ट खेळाडू डॉमनिक फर्नांडिस यांना चषक देवून गौरविण्यात आले. बुधवारी दुसरा क्वालिफायर सामना साईराज वॉरियर्स व पोतदार के. आर. शेट्टी यांच्यात खेळविण्यात येणार आहे.