महिलांमध्ये भीतीचे वातावरण ः चोरटय़ांना जेरबंद करण्याची मागणी
प्रतिनिधी/ सातारा
इस्माईल मुल्ला लॉ कॉलेज समोरून पायी चालत निघालेल्या महिलेचे मंगळसुत्र धूम स्टाईलने दोन इसमांनी चोरून पसार झाले. ही दोन दिवसांतील दुसरी घटना आहे. अशीच घटना पिरवाडी परिसरात घडली. यामुळे महिलांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरटय़ांना जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पद्मिनी मनोहर चव्हाण (वय 47, रा. शनिवार पेठ सातारा) या गुरूवार दि. 15 रोजी सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज समोरून पायी चालत निघाल्या होत्या. यावेळी पाठीमागून दोन इसम मोटार सायकलवरून आले. त्यांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले आणि पसार झाले. महिलने आरडाओरडा केला. परंतु त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.
दोन दिवसांतील दुसरी घटना
पिरवाडी (ता. सातारा) गावच्या हद्दीतून एक 61 वर्षीय वृद्ध महिला पायी चालत निघाली होती. यावेळी पाठीमागून येणाऱया दोन इसमांनी तिच्या गळ्यातील 90 हजार रूपये किंमती गंठण हिसकावले आणि पसार झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरटय़ांना जेरबंद करण्याचे मोठे आवाहन शहर पोलिसांपुढे आहे.