अहिल्या परकाळे,कोल्हापूर
Kolhapur Education News : केंद्र सरकारने कौशल्यावर आधारीत विद्यार्थी हिताचे नवीन शैक्षणिक धोरण तयार केले आहे.या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सुचना देशभरातील विद्यापीठांना केल्या आहेत.त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थी केंद्रबिंदू मानून पदवी प्रथम वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. शिवाजी विद्यापीठ संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालय, अधिविभाग विद्यार्थी, प्राध्यापक,कर्मचाऱ्यांना स्वनिधीतून प्रोत्साहनपर अनुदान देते. परिणामी विद्यापीठातील 34 प्राध्यापकांनी जागतिक क्रमवारीत विद्यापीठाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. विद्यापीठाचे हे पाऊल नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने महत्वाचे मानले जाते. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणाची आव्हाने पेलणे शिवाजी विद्यापीठाला सुकर झाले आहे.
शिवाजी विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या दृष्टीने अभ्यासक्रमांची अनुकुल रचना केली आहे.प्रवेश घेण्याची क्षमता वाढवली असून स्वतंत्र स्किल बेस्ड अभ्यासक्रम राबवत,अभ्यासक्रम निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे.तसेच गेल्या दहा वर्षापासून चॉईस बेस्ड क्रेडीट सिस्टिम अंतर्गत दुसऱ्या शाखेच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जातेय.ही सुविधा विद्यापीठ व महाविद्यालयात उपलब्ध करून दिली आहे.विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी स्तुती उपक्रम सुरू केला आहे.वनस्पतीपासून अर्क काढण्याची अद्यावत यंत्रणा उपलब्ध आहे.अत्याधुनिक क्रीडा सुविधा दिल्या असून,परदेशात स्पर्धेसाठी जाणाऱ्या खेळाडूंना 50 हजार अर्थसहाय्य केले जाते. याचा खेळाडूंवर सकारात्मक परिणाम झाला असून,सध्या जम्मू विद्यापीठ,जबलपूर मध्यप्रदेश येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंनी भरभरून यश संपादन करीत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रेवला आहे.
स्टार्टअपच्या माध्यमातून संशोधन आणि त्यावर प्रक्रिया करून लस्सी, कॅफेनयुक्त कॉफी, शिवतेज तेल असे काही उत्पादने बाजारात विक्री होतेय. तसेच सेक्शन-8 कंपनीच्या माध्यमातून नवीन उद्योगांना प्रोत्साहन दिले जातेय.याचबरोबर मागील 11 वर्षापासून विद्यापीठ केंद्र व राज्य शासनाच्या सर्वेक्षणात अत्युच्च कामगिरी बजावत आहे.शिवाजी विद्यापीठाने पीएच.डी.साठी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. महाविद्यालयीन शिक्षक,प्रशासकीय कर्मचाऱयांचा संपूर्ण डेटा ऑनलाईन स्वरूपात विद्यापीठाकडे उपलब्ध आहे.एवढेच नाही तर महाविद्यालय ऑडीटही ऑनलाईन केले असून त्याचे मूल्यांकनही ऑनलाईन केले जाणार आहे. निवडणूक मतदान यादीसुध्दा ऑनलाईन प्रसिध्द केल्याने संपूर्ण संगणकीकरण झाले म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.परिसरातील जैवविविधता विद्यापीठाच्या यशात महत्वाचा भाग ठरतेय. विद्यापीठातील 10 विहरी, 12 तळ्यांच्या माध्यमातून केलेले स्वतंत्र पाणी व्यवस्थापनाने राज्यासमोर आदर्श घालून दिला आहे.या सर्व उपक्रमांमुळे नवीन शैक्षणिक धोरणाची आव्हाने पेलने शिवाजी विद्यापीठाला सुकर झाले आहे.
नवीन वर्षात विद्यापीठ शंभर टक्के कॅशलेस
ऑनलाईनच्या माध्यमातून गेटवे पेमेंट, ऑनलाईन प्रवेश, परीक्षा आणि पदवीदान अर्जही भरला जातोय. तसेच परीक्षा विभागाने स्वतःची एस. आर. पी.डी. तयार केली असून या माध्यमातून ऑनलाईन प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना पाठवली जाते. तसेच 30 दिवसाच्या आत परीक्षेचा निकालही जाहीर केला जाईल. त्यामुळे 1 जानेवारीपासून शिवाजी विद्यापीठ शंभर टक्के कॅशलेस होणार आहे.
विद्यापीठातील कौशल्याधिष्ठीत कार्यक्रम
पी. जी. डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी, हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटय़ुट, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, साखर कारखान्याजवळ इन्स्टिट्युट फॉर शुगर ऍण्ड अलाईड प्रोडक्टस् टेक्नॉलॉजी इन्स्टिट्युट, संलग्न महाविद्यालयात गरजेनुसार खादी प्रोडक्शन व डिझाईन अभ्यासक्रम, पर्यटन विषयी अभ्यासक्रम (ट्रव्हल-टुरिझम), रेशीमशास्त्र असे जवळपास 200 पेक्षा जास्त विषय कौशल्याधिष्ठीत आहेत. दूरशिक्षणला पाच वर्षाची मान्यता मिळाली असून अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून ऑनलाईन 2023 शिकवला जाणार आहे. ‘लोककला संवर्धन’ केंद्र स्थापन करून लोककलेचा वारसा पुढे नेण्याचे काम विद्यापीठ करीत आहे.
नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला सुरुवात
नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रीत असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाकडून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे. शासनाच्या नियमानुसार अभ्यासक्रमात बदल करून, कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम तयार केले आहेत. नियमानुसार आवश्यक ते सर्व बदल केले असल्याने शिवाजी विद्यापीठ अंमलबजावणीसाठी पूर्णपणे सज्ज आहे.
डॉ. पी. एस. पाटील (प्र-कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ)
Trending
- जिह्याचा उत्कृष्ट विकास आराखडा सादर करा; जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन
- पन्हाळा तालुक्यात धूळवाफ भात पेरणीची धांदल; अंतरमशागतीसाठी जोर
- आंबोली – माडखोल रस्त्याचे काम म्हणजे केवळ मलमपट्टीच!
- दुर्गराज रायगडवरील गाईडना मिळणार आरोग्य विम्याचे संरक्षण
- malvan :कोळंबमध्ये दोघा महिलांचा सत्कार
- sawantwadi :सैनिक मुलांच्या वसतिगृहाला माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत
- भाजप कोल्हापूर शहर अध्यक्षपदाचा सस्पेन्स वाढला!
- बारसू प्रकल्पाविरोधात राज्यव्यापी आंदोलन