गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या…च्या जयघोषात बाप्पांचे विसर्जन
प्रतिनिधी /खानापूर
शहर परिसरात अनेक घरांमध्ये पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणरायाला रविवारी सायंकाळी भक्तिभावाने निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… अशा जयघोषात रात्री उशिरापर्यंत गणरायांचे विसर्जन सुरुच होते. यामुळे मलप्रभा नदीघाटावर गणेश भक्तांची एकच गर्दी झाली होती.
सायंकाळी चार वाजल्यापासून घरगुती गणपतींचे विधीवत पूजन करून विसर्जनासाठी आणण्यात येत होत्या. नदीघाटावर घरगुती गणपती विसर्जनाचे पूजन, आरती करून गणपती मलप्रभा नदीत विसर्जन करण्यात येत होते. यावेळी घरातील पुरुष, महिला, लहान मुले मोठय़ा संख्येने विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली होती. रिक्षातून तसेच डोक्यावरून विसर्जनासाठी घरगुती गणपतींची घाटावर विसर्जनासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. घरगुती गणपतीचे विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शहरासह तालुक्यात ओवसे पूजवण्याची परंपरा आहे. रविवारी ओवसा पूजन सकाळपासूनच सुरू होते. नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते हे पूजन करण्यात येते. यासाठी नवविवाहिता आपल्या पतीसह पूजन करताना दिसून येत होत्या.
सायंकाळी सहा वाजता शासकीय कार्यालयातील गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू करण्यात आली. यात जि. पं. उपविभाग, तहसीलदार कार्यालय, हेस्कॉम, पोलीस स्टेशन तसेच परिवहन खात्याचे गणपती सहभागी होते. बँन्ड पथकासह, ढोलताशे, फटाक्यांच्या आतषबाजीत ही विसर्जन मिरवणूक शहरातील राजा छत्रपती शिवस्मारकापासून नदीघाटापर्यंत रात्री उशिरा सुरू होती. यावर्षीही राम मंदिर येथील नदीघाटावर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.