केवळ काही तासांत संशयिताला अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
शिंदोळी (ता. बेळगाव) येथील ज्योतिषाचा खून केल्याच्या आरोपावरून केवळ काही तासांत हिरेबागेवाडी पोलिसांनी त्याच्या मित्राला अटक केली आहे. त्याच्या जवळून खुनासाठी वापरण्यात आलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी हलगा येथे खुनाची घटना घडली होती.
विठ्ठल सांबरेकर (वय 32, रा. कोंडसकोप्प, ता. बेळगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी खुनाच्या घटनेनंतर काही तासांत विठ्ठलला अटक केली आहे. आर्थिक व्यवहारातून ज्योतिषाचा काटा काढल्याची कबुली विठ्ठलने दिली आहे.
गदगय्या रेवणय्या हिरेमठ (वय 40, रा. शिंदोळी) याचा मोटारसायकलवरून जाताना शुक्रवार दि. 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास मानेवर वार करून खून करण्यात आला होता. पोलिसांनी अटक केलेला विठ्ठल हा गदगय्याचा मित्र असून मोटारसायकलवरून मागे बसून त्याने गदगय्यावर कोयत्याने वार केल्याचे उघडकीस आले आहे.
व्यवसायाने ज्योतिषी असलेल्या गदगय्याशी गेल्या दोन वर्षांपासून विठ्ठलची मैत्री होती. आर्थिक अडचणीसाठी गदगय्याने विठ्ठलकडून 2 लाख रुपये घेतले होते. आपली 100 बकरी विकून विठ्ठलने त्याला पैसे दिले होते. दिलेला पैसा परत मागितल्यामुळे या दोघांमध्ये वाद सुरू झाला होता. शुक्रवारी खून करण्याच्या उद्देशाने कोयता घेऊन विठ्ठल गदगय्याकडे आला होता.
दोघे मोटारसायकलवरून सांबऱयाला गेले. आपल्या गुरुला भेटण्यासाठी गदगय्या चेन्नईला जाणार होता. विठ्ठलने त्याला हलगापर्यंत मोटारसायकलवरून सोडण्यास सांगितले. सांबरा येथेच त्याचा काटा काढण्याचा विचार मनात आला होता. मात्र त्याला धाडस झाले नाही. हलगा येथे येवून मोटारसायकल चालविणाऱया गदगय्यावर कोयत्याने वार केला आहे.