पुलाची शिरोली / वार्ताहर
बोगस नळ पाणीपुरवठा कनेक्शन जोडून देण्यास भाग पाडणाऱ्या सत्ताधारी गटाच्या पदाधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी महाडिक गटाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीबाबत शिरोली ग्रामपंचायतीला सोमवारी निवेदन देण्यात आले.
यावेळी येथील विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याची शासकीय अधिकारात चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच सत्ताधारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने सत्तेचा गैरवापर करून आपल्या गटातील लोकांसाठी अनाधिकृत नळ पाणीपुरवठा कनेक्शन चालू करून घेतली आहेत. त्यांचा सर्वे करून अशा लोकांची नावे जाहीर करुन कारवाई झाली पाहिजे. अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. ग्रामविकास अधिकारी श्री. भोगण यांनी हे निवेदन स्विकारले.
यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी ग्रामविकास अधिकारी भोगण हे चुकीच्या व बेकायदेशीर गोष्टींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत या ग्रामसेवकाचे ‘करायचे काय…खाली डोकं वर पाय!’ ‘विकास कामांमध्ये ढपला पाडलेल्या व्यक्तीचे करायचं काय…खाली डोकं वर पाय!’ ‘बोगस नळ पाणीपुरवठा कनेक्शन देण्यास पुढाकार घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे करायचे काय…खाली डोकं वर पाय!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात माजी सरपंच अनिल शिरोळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, ग्राहक सेनेचे अध्यक्ष दिपक यादव, माजी पंचायत समिती सदस्य बबनराव संकपाळ, उद्योजक बाळासाहेब पाटील, सलिम महात, माजी उपसरपंच कृष्णात करपे, राजहंस पाटील, डॉ. सुभाष पाटील, सागर कौंदाडे, सचिन गायकवाड, धनाजी पाटील, योगेश खवरे, अनिल सोडगे, सतिश सोडगे, निखील पाटील, गणेश यादव, अमोल सोडगे, मनोज पाटील, भगवान पाटील, विश्वास गावडे, रावसाहेब सोडगे, किर्तीक भोसले, अरुण पाटील, महंमद महात, सयाजी काटकर, सायबाना रोहिदास, रफीक पखाले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.