पंकज परब सामनावीर, अजय भोसले मालिकावीर

क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर सावंतवाडी रिजनल संघाने अंतिम सामन्यात बेळगाव रिजनल संघाचा 7 गड्यांनी पराभव करुन लोकमान्य प्रिमियर लीग चषक पटकाविला. पंकज परब (सावंतवाडी) तर अजय भोसले (बेळगाव) यांना अनुक्रमे सामनावीर व मालिकावीर पुरस्कारने गौरविण्यात आले.
आरपीडी महाविद्यालयावर आयोजित लोकमान्य प्रिमियर लीग टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात म्हापसा रिजनल संघाने 8 षटकात 3 बाद 61 धावा केल्या. प्रविणने 20, योगेशने 16 धावा केल्या. बेळगाव रिजनलतर्फे उत्तम शिंदे, भाऊ कुऱ्हाडे, प्रविण यांनी प्रत्येकी 2 तर प्रमोद व महेश गावडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव संघाने 7.2 षटकात 3 बाद 62 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. अजय भोसलेने 22, भाऊ कुऱ्हाडेने 13, प्रमोद पालेकरने 12 धावा केल्या. म्हापसातर्फे योगेश व मयूर यांनी प्रत्येक 1 गडी बाद केला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात सावंतवाडी रिजनल संघाने 8 षटकात 5 बाद 80 धावा केल्या. अमितने 4 चौकारासह 22, पंकज परबने 29 तर मयूरने 19 धावा केल्या. तरुण भारत बेळगावतर्फे मयूर, तन्वीर, काशी, रवी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना तरुण भारत संघाने 8 षटकात 6 बाद 43 धावाच केल्या. हर्षलने 10 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे पंकज व सागर यांनी प्रत्येकी 2 तर अमितने 1 गडी बाद केला.
अंतिम सामन्यात बेळगाव संघाने 8 षटकात 5 बाद 85 धावा केल्या. अजय भोसलेने 2 षटकार व 4 चौकारासह 64 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे अमित व सागर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद
केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सावंतवाडी संघाने 8 षटकात 3 बाद 89 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. पंकज परबने 2 उत्तुंग षटकार 3 चौकारासह नाबाद 29, गौरव एच. ने 1 षटकार, 2 चौकारांसह 25 धावा केल्या. शेवटच्या 3 षटकात 32 धावांची गरज असताना पंकज परबने 8 व्या षटकात 16 धावा केल्या. शेवटच्या षटकात 12 धावा हव्या असताना पहिल्या 3 चेंडूत केवळ 1 धाव निघाली होती. पण शेवटच्या 3 चेंडूवर 1 षटकार व 2 चौकारांच्या सहाय्याने सामना सावंतवाडी संघाला एकहाती जिंकून दिला. बेळगावतर्फे प्रमोद पालेकरने 2, उत्तम शिंदे व भाऊ कुऱ्हाडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे लोकमान्यचे संचालक प्रभाकर पाटकर, विठ्ठल प्रभू, सुबोध गावडे, गजानन धामणेकर, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले, कर्नल दीपक गुरंग, विनायक जाधव, एम. एन. कुलकर्णी, सी. आर. पाटील यांच्या हस्ते विजेत्या सावंतवाडी व उपविजेत्या बेळगाव संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर पंकज परब (सावंतवाडी), उत्कृष्ट झेल विशाल सावंत (मॅनेजमेंट), उत्कृष्ट संघ कोल्हापूर रिजनल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नित्यानंद मांजरेकर (सावंतवाडी), उत्कृष्ट यष्टीरक्षक पंकज परब (सावंतवाडी), उत्कृष्ट फलंदाज संजय दळवी (कोल्हापूर), उत्कृष्ट गोलंदाज योगेश (म्हापसा), मालिकावीर अजय भोसले (बेळगाव) यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून विजय पाटील, सोमनाथ सोमनाचे तर स्कोरर म्हणून प्रसाद नाडगौडा यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजू दळवी, सतीश गोडसे, धर्म कोळी, उमेश कासेकर, गणेश कंग्राळकर, अमर खणगावकर व लोकमान्य कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.