युवराज भित्तम /म्हासुर्ली
म्हासुर्ली (ता.राधानगरी) वन परिमंडळ क्षेत्रामध्ये वन विभागाकडून सन २०१९ मधील पावसाळ्यात शासनाच्या भरगच्च वनीकरण कार्यक्रमातून सुमारे शेकडो एकर जमिनीवर विविध देशी जातीच्या वृक्षांची लागवड केली.पहिली तीन वर्षे सदर रोपवने वनविभागाने योग्यरीत्या जोपासले.मात्र गत वर्षापासून वनविभागाच्या दुर्लक्षामुळे सदर रोपवनांतील झाडांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.तर नुकतेच म्हासुर्ली – बाजारीवाडा दरम्यानच्या रोपवनात आग (वणवा) लागल्याने सर्व रोपे जळून खाक झाली असून पर्यावरण प्रेमींतून वनविभागाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र शासन वन विभागाकडून भरगच्च वनीकरण कार्यक्रमांतर्गत म्हासुर्ली वन परिमंडळ क्षेत्रातील म्हासुर्ली,बाजारी धनगरवाडा,पाल बु॥,गवशी सह इतर ठिकाणी शेकडों हेक्टर वन जमिनीवर देशी जातीच्या विविध वृक्षांच्या लाखों रोपांची लागवड केली आहे.सदर वृक्ष लागवड केल्यामुळे बोडक्या पडलेल्या डोंगरावर वनाने हिरवाई निर्माण झाली होती.

राधानगरी वन परिमंडळ विभागातील त्यावेळच्या वनपाल,वनरक्षक व वनमजूर यांनी मोठ्या कष्टाने पहिली तीन वर्षे सदर रोप वनांची देखभाल केली.त्यामुळे देशी जातीच्या आवळा,चिंच,पळस, काजू,उंबर,हिरड,जांभळ,करंज,हिरडा,ऐन यांच्यासह इतर लाखो वृक्षांचे एक प्रकारे संवर्धन झाले होते.वन विभागाकडून पहिली तीन वर्षे सदर रोपवनांची वन मजुरांकडून देखभाल केली जात होती. त्यामुळे सदर रोप वनांमध्ये मानवी हस्तक्षेप पूर्णता कमी झाला होता.आणि झाडांची वाढ चांगल्या प्रकारे झाली होती.
मात्र, गेल्या एक दीड वर्षापासून सदर रोप वनांच्या देखभालीसाठी असलेले रोजंदारी कर्मचारी बंद केले आहेत.परिणामी सदर रोप वनांकडे वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच सदर झाडांची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली असून अनेक झाडे मरण पावली आहेत. वनविभागाने सदर रोपवनांची देखभाल करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या असत्या तर झाडांचे नुकसान टळले असते.गतवर्षी बरोबरच यावर्षी ही म्हासुर्ली – बाजारीवाडा दरम्यानच्या ५ हेक्टर वरील रोपवनात वणव्याची आग लागल्याने हजारो रोपे जळून गेली आहेत.त्यामुळे पर्यावरण प्रेमीतून संताप व्यक्त असून वनविभागाच्या वरिष्ठाने याची तत्काळ दखल घेऊन सदर सर्वच रोपवनाची सुरक्षा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी अशी मागणी होतो आहे.

वन विभागाचे दुर्लक्ष
शासनाने पाण्यासारखा पैसा खर्च करून जतन केलेल्या वृक्ष लागवडीची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या असत्या तर सदर रोप वनांचे रक्षण झाले असते. या सर्व प्रकाराला पूर्णता वनविभागाचे दुर्लक्ष जबाबदार आहे.त्यामुळे बाजारीवाडा येथील रोपवन जळून खाक झाले आहे. याची संबंधितांनी चौकशी करावी.
शौकत मुलाणी, पर्यावरण प्रेमी नागरिक