ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंद केल्यांनतर त्यांच्यासोबत शिवसेनेतील ४० आमदार सोबत गेले. यांनतर शिवसेनेचे १२ खासदारांचा शिंदे गटाला पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आमदारांपाठोपाठ आता विविध पालिकांचे आजी-माजी नगरसेवकही शिंदे गटात सामील होत आहेत. पालघरमधील शिवसेनेच्या मोठ्या गटाने शिंदे गटाला पाठींबा दिला आहे. खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit), आमदार श्रीनिवास वनगा, माजी जिल्हाप्रमुख राजेश शहा, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे अनेक पदाधिकारी तसेच नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. पण खासदार राजेंद्र गावित यांनी शिंदे गटात सामील झाल्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गावित यांच्या प्रवेशाबाबत माहिती दिली आहे.
शिंदे गटात प्रवेश केला नाही
दरम्यान, शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर खासदार गावित हे शिंदे गटात सामिल झाल्याचे म्हटले जात होते. मात्र आता राजेंद्र गावित यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शिंदे गटात प्रवेश केला नसल्याचा खुलासा पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांची आपण फक्त सदिच्छा भेट घेतल्याचे राजेंद्र गावित यांनी म्हटले आहे.
“माझ्या मतदारसंघातील एमएमआरडीए आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक गावांसोबत रस्ते जोडलेले नाहीत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. मी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला नाही. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असल्याने कोणत्याही पक्षातील लोकप्रतिनिधी त्यांना भेटू शकतात. माझ्या मतदार संघातील कामे करुन घेण्यासाठी त्यांना भेटलो,” अशी प्रतिक्रिया राजेंद्र गावित यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.
हे ही वाचा : आम्ही कायदेशीर नामांतर करणार- मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची ग्वाही
“माझ्या मतदारसंघातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. पण मी फक्त सदिच्छा भेट देण्यासाठी गेलो होतो. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशा प्रकारचे पत्र आम्ही खासदारांनी उद्धव ठाकरेंना दिले होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी मिळाली आणि उद्धव ठाकरेंनी सकारात्मक पद्धतीने त्यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन,” असेही राजेंद्र गावित म्हणाले.
मुख्यमंत्राचेही स्पष्टीकरण
राजेंद्र गावित यांनी आपण शिंदे गटात प्रवेश केला नसल्याचे स्पष्टीकरण दिल आहे. यांनतर आता मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक लोक भेटायला येत असतात. राजेंद्र गावित फक्त मला भेटायला आले होते. ते अजून शिंदे गटात आलेले नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : राष्ट्रपती, मुख्यमंत्रीही थेट करा ; विरोधी पक्षनेते अजित पवार शिंदे-भाजप सरकारवर संतापले