उपपंतप्रधानांसह 4 मंत्र्यांनी दिला राजीनामा ः विरोधी पक्षाच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला पाठिंब्यामुळे नाराज
वृत्तसंस्था / काठमांडू
नेपाळमध्ये दोन महिन्यांपूर्वी स्थापन पुष्पकमल दहल यांच्या सरकारमधील उपपंतप्रधान राजेंद्र सिंह लिंगदेन यांच्यासमवेत राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या (आरपीपी) 4 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. प्रचंड सरकारने आघाडीधर्म बाजूला ठेवत राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसचे उमेदवार रामचंद्र पौडेल यांना समर्थन देण्याची घोषणा केली आहे. यामुळे नाराज आरपीपीच्या मंत्र्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित मंत्र्यांच्या पक्षाने अद्याप अधिकृतपणे प्रचंड सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतलेला नाही. परंतु पाठिंबा काढून घेतल्यास प्रचंड सरकार संकटात सापडू शकते. नेपाळच्या संसदेत 275 जागा असून यात आरपीपीचे 14 खासदार आहेत. आरपीपी हा देशातील 5 व्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
प्रचंड सरकारने संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मंजूर केला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंत्रिपदाचा राजीनामा देणारे आरपीपीचे नेते लिंगदेन यांच्याकडे ऊर्जा, जलसंपदा आणि सिंचन मंत्रालयाची धुरा होती. तर पक्षाचे उपाध्यक्ष विक्रम पांडे यांच्याकडे शहरविकास मंत्रालय आणि बहादुर प्रधान यांच्याकडे कायदा, न्या आणि संसदीय कामकाज मंत्रालयाची जबाबदारी होती. दीपक बहादुर सिंह हे ऊर्जा राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
पौडेल यांचा विजय जवळपास निश्चित
नेपाळी काँग्रेसचे नेते रामचंद्र पौडेल हे नेपाळचे राष्ट्रपती होणार हे जवळपास निश्चित आहे. पौडेल यांना नेपाळी काँग्रेस, सीपीएन-माओवादी सेंटर, जनता समाजवादी पक्ष आणि सीपीएन समवेत 8 पक्षांचा पाठिंबा प्राप्त आहे. नेपाळमध्ये 9 मार्च रोजी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होणार आहे. नेपाळमध्ये राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो आणि एका व्यक्तीला केवळ दोनवेळाच राष्ट्रपती होता येते.