न्यायालयाकडून तीन वर्षांसाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जारी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून विशेष न्यायालयाने त्यांना नवीन पासपोर्ट बनवण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने त्यांना एनओसी म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र जारी केले असून ते पुढील 3 वर्षांसाठी वैध असेल. संसदेचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांनी आपला डिप्लोमॅटिक पासपोर्ट सरेंडर करत स्वत:साठी सामान्य पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाला अनुसरून त्यांना नवीन पासपोर्ट मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींना पासपोर्टप्रकरणी एनओसी देण्यास विरोध केला होता. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी जामिनावर असून या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता त्यांना पासपोर्ट काढण्यासाठी एनओसी देऊ नये असा युक्तिवाद स्वामी यांनी केला होता. या मुद्द्यावर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी झालेल्या युक्तिवादामध्ये राहुल गांधींच्या वकिलांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडल्यानंतर न्यायालयाने त्यांना एनओसी देत असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आता पासपोर्ट मिळविण्याची पुढील प्रक्रिया सुरू होऊन त्यांना नवा पासपोर्ट जारी केला जाणार आहे.