आज होणार प्रतिष्ठापना : घाडी, गुरव गल्ल्यांमधील शेतकरी सजविलेल्या बैलजोडय़ांसह सहभागी

प्रतिनिधी /खानापूर
खानापूरची ग्रामदेवता मऱयाम्मा देवी मंदिरात नव्याने प्रतिष्ठापित होणाऱया मूर्तीची मंगळवारी शहरात शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत भाविकवर्ग मोठय़ा संख्येने सहभागी झाला होता. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
या शोभायात्रेत घाडी, गुरव गल्लीमधील शेतकरीवर्ग आपल्या सजविलेल्या बैलजोडय़ांसह सहभागी झाले होते. शोभायात्रेत जाणारे सर्व मार्ग रांगोळय़ांनी सजविले होते. रात्री 11 वा. मऱयाम्मा मंदिराकडे आगमन झाल्यावर शोभायात्रेची सांगता झाली. त्यानंतर मूर्तीला धार्मिक विधीसाठी गाभाऱयाबाहेरील सभामंडपात ठेवण्यात आले.
मंगळवारी सकाळी मंदिरात विविध धार्मिक विधीला सुरुवात झाली. यजमानपद दिग्विजय प्रतापराव सरदेसाई यांनी सपत्निक स्वीकारले होते. प्रतिष्ठापना विधीचे पौरोहित्य शार्दुल जोशी आणि त्यांचे ब्रह्मवृंद करत आहेत. होमहवन तसेच देवीला स्नान घालणे व इतर धार्मिक विधींचा समावेश होता.
उद्या महाप्रसाद
गुरुवार दि. 14 रोजी सकाळी 8.30 वा. धार्मिक विधीला प्रारंभ होणार असून 9.32 वाजता प. पू. सद्गुरु चन्नबसव देवरु स्वामीजींच्या हस्ते कळसारोहण व 11.02 वाजता प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. तसेच शुक्रवार दि. 15 रोजी सकाळी 9 वाजता नारायण दादोबा घाडी आणि त्यांच्या सुविद्य पत्नींच्या हस्ते सत्यनारायण पूजा व सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मऱयाम्मा मंदिरामुळे खानापूर शहराच्या वैभवात नवी भर पडली आहे.