पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती ‘भारत जोडो’मध्ये सहभागी
@ श्रीनगर / वृत्तसंस्था
राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या काश्मीरमध्ये शेवटच्या टप्प्यात आली आहे. या यात्रेत शनिवारी पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती आणि त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती सामील झाल्या. तसेच राहुल यांच्यासोबत प्रियांका गांधीही दिसून आल्या. याचदरम्यान, शनिवारी राहुल यांनी यांनी 2019 मध्ये पुलवामा स्फोटात प्राण गमावलेल्या 40 जवानांना श्रद्धांजली वाहिली.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिह्यातील अवंतीपोरा येथून आपली ‘भारत जोडो यात्रा’ पुन्हा सुरू केली. सुरक्षेमध्ये त्रुटी ठेवल्याचा आरोप केल्यानंतर पक्षाने अनंतनागमध्ये यात्रा तात्पुरती थांबवली होती. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात पोलिसांनी केलेली सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. शुक्रवारी जम्मू-काश्मीरमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेत अनेक लोक घुसले होते. त्यानंतर यात्रा काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आली होती. सुरक्षेतील या त्रुटीसंबंधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून राहुल यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत माहिती दिली होती. खर्गे यांनी या प्रकरणात गृहमंत्र्यांनी स्वतः वैयक्तिक हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. तसेच यात्रेत सहभागी होणाऱया नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची मागणी केली.
मणिशंकर अय्यर यांचे ‘पाकिस्तान प्रेम’
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत पोहोचलेल्या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भारताने पाकिस्तानला चर्चेचा प्रस्ताव द्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. मी नेहमीच पाकिस्तानशी चर्चा करण्याच्या बाजूने असतो. मी तिथे 3 वर्षे राहिलो असून पाकिस्तानातील सामान्य जनतेला शांतता हवी आहे, असेही ते म्हणाले. तसेच पाकिस्तानशी चर्चा सुरू होण्याच्यादृष्टीने आपण पावले उचलायला हवीत, असे वक्तव्यही त्यांनी केले. भाजपने अय्यर यांच्या या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे सहप्रभारी आशिष सूद यांनी अय्यर यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसचा खरा चेहरा दिसून येतो, असे स्पष्ट केले आहे.