महालक्ष्मी ग्रुपतर्फे 7 ते 10 जानेवारीपर्यंत आयोजन : सर्वांना मोफत प्रवेश : संस्थापक विठ्ठल हलगेकर यांची माहिती
प्रतिनिधी /खानापूर
येथील महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने कोल्हापूर येथील ‘शिवगर्जना’ हे महानाट्या येथील शांतीनिकेतन शाळेच्या मैदानावर दि. 7 ते 10 जानेवारीपर्यंत सायंकाळी 6 ते 9.30 या वेळेत हे प्रयोग होणार आहेत. शांतीनिकेतन शाळेचा स्नेहसंमेलन 5 व 6 रोजी याच व्यासपीठावर आयोजित केला आहे. त्यानंतर दि. 7 रोजी या नाट्या प्रयोगाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक चेअरमन विठ्ठल हलगेकर यांनी दिली. शांतीनिकेतन येथील सभागृहात पत्रकारांशी ते बोलत होते.
हलगेकर पुढे म्हणाले, कोल्हापूर येथील स्वप्नील यादव यांनी दिग्दर्शित केलेले तसेच 350 कलाकार असलेल्या शिवगर्जना हे महानाट्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संपूर्ण जीवनपट उलघडणारे आहे. या महानाट्यात अकराव्या शतकापासून ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचा इतिहासाचा मागोवा घेण्यात आला आहे. या महानाट्यात फिरत्या रंगमंच्यावर भव्य सेट उभारून हत्ती, घोडे, उंट यासह लढाईचे प्रसंग प्रत्यक्षात रंगमंच्यावर दाखवण्यात येणार आहे. डोळे दीपवणारी आकर्षक अशी आतषबाजीही या महानाट्यात करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी या महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव, निर्माता रेणू यादव, लेखक इंद्रजीत सावंत, सहदिग्दर्शक शकील पटेल, वेशभुषा प्रताप कंगळे, व्यवस्थापक धैर्यशील देसाई, आर्ट डायरेक्टर अमर मोरे यासह महालक्ष्मी ग्रुपचे संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते.
महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने खानापुरात अशा भव्य महानाट्या प्रयोगाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात येत आहे. या नाट्या प्रयोगासाठी 14 हजार जण एकाचवेळी नाटक पाहू शकतील, अशी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. या ठिकाणी नाट्या रसिकांना पार्किंगची सोय करण्यात आली आहे. हा नाट्याप्रयोग पूर्णपणे मोफत दाखविला जाणार आहे. तालुक्यातील सर्व शिवप्रेमींना पास वितरित करण्यात येणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी पास वितरणाचे पाऊल उचलले आहे. पास घेतलेल्यांनीच नाट्याप्रयोगाला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
350 कलाकार साकारणार भूमिका
या महानाट्यात एकूण 350 कलाकार भूमिका साकारणार आहेत. यातील निम्म्याहून जास्ती कलाकार हे स्थानिक पातळीवरचे निवडले जाणार आहेत. त्यासाठी गुरुवार दि. 22 रोजी शांतिनीकेतन शाळेत इच्छुक कलाकारांनी या नाट्या प्रयोगाच्या ऑडीशनसाठी उपस्थित रहावे. यामध्ये 5 वर्षापासून ते 70 वर्षाच्या कलाकाराला संधी देण्यात येणार आहे. तरी इच्छुक कलाकारांनी दि. 22 रोजी ऑडीशनसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन या नाटकाचे दिग्दर्शक स्वप्नील यादव यांनी केले आहे. या नाट्याप्रयोगाचे देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 70 हून प्रयोग करण्यात आले आहेत.
या नाट्या प्रयोगाच्या उद्घाटनासाठी भाजपचे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. दरम्यान, 7 ते 10 तारखेपर्यंत दररोज सायंकाळी 5 वाजता याच व्यासपीठावर तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. तसेच दुर्गंम भागातील शिवप्रेमी जनतेला हा नाटक पाहण्यासाठी मोफत प्रवास व्यवस्था करण्यात येणार आहे. या नाट्याप्रयोगात विनायक चौगुले छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तर जीजाबाइं&च्या भूमिकेत दीपाली हंडे दिसणार आहेत.