3 वर्षीय मुलीला झोपवून आई गेली होती कामावर
वृत्तसंस्था /हैदराबाद
तेलंगणाच्या हैदराबादमध्ये एका एसयुव्हीने झोपलेल्या 3 वर्षीय मुलीला चिरडले आहे. या मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. ही घटना एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घडली आहे. मुलीची आई कविता (22 वर्षे) यांनी हयातनगर पोलीस स्थानकात याप्रकरणी तक्रार नोंदविल्यावर पोलिसांनी आरोपी हरि राम कृष्ण विरोधात गुन्हा नोंदविला आहे. संबंधित कार अबकारी उपनिरीक्षकाच्या नावावर नोंदणीकृत आहे. उपनिरीक्षकाचा पती ही कार चालवत होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यात मुलगी पार्किंगमध्ये झोपलेली असल्याचे दिसून येते. तेव्हाच एक एसयुव्ही या मुलीच्या दिशेने येत तिला चिरडत असल्याचे दिसून येते. यानंतर चालक कार रिव्हर्स घेत असल्याचेही आढळून आले आहे. मुलीची आई कविता ही कर्नाटकातून कामाच्या शोधात हैदराबाद येथे आली होती. ती स्वत:चा 6 वर्षीय मुलगा अन् 3 वर्षीय मुलीसोबत राहत होती. एका बांधकामस्थळी काम शोधण्यासाठी जाण्यापूर्वी कविता यांनी स्वत:च्या मुलीला एका अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये झोपविले होते. ही केवळ एक दुर्घटना आहे, कामावरून दुपारी परतल्यावर पार्किंग स्पॉटवर कार पार्क करत होतो. यावेळी झोपलेल्या मुलीवर चादर असल्याने ती नजरेस पडली नसल्याचे कारचालकाने पोलिसांना सांगितले आहे.