मराठी भाषिकांचा संकल्प : बेळगावात हुतात्म्यांना अभिवादन : हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार

प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह संपूर्ण सीमाभाग जोवर महाराष्ट्रात जाणार नाही तोवर मराठी भाषिकांचा सीमालढा सुरूच राहणार, असा संकल्प हुतात्मादिनी सीमावासियांनी केला. सीमालढ्यात प्राणाचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मंगळवारी हुतात्मा चौक येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्म्यांना स्मरून मराठी भाषा, संस्कृतीच्या रक्षण व संवर्धनासाठी कायम प्रयत्नशील राहू, असा निर्धार करण्यात आला.

प्रारंभी सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून ‘अमर रहे, अमर रहे, सीमा हुतात्मे अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. हुतात्मा चौक येथून फेरीला सुरुवात झाली. रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसूरकर गल्ली, किर्लोस्कर रोड येथून पुन्हा हुतात्मा चौक या मार्गावर फेरी काढण्यात आली. हुतात्मा मधु बांदेकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे तसेच सीमासत्याग्रही बाबुराव ठाकुर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, भाई एन. डी. पाटील यांच्या जाण्याने सीमावासियांचे मोठे नुकसान झाले असून, प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण होते. आपण परराज्यात आहोत याची जाणीव इथल्या राज्यकर्त्यांमुळे आपल्याला पदोपदी होते. 1956 पासून आजतागायत मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी आपण झटत आहोत. सीमालढ्यातून मिळालेला स्वाभिमान व उर्मीतून हा लढा शेवटपर्यंत दिला जाणार आहे. यासाठी आपण कायम लढत रहा, असा सल्ला त्यांनी दिला.

मालोजी अष्टेकर प्रास्ताविकात म्हणाले की, 16 जानेवारी 1956 रोजी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी भाषावार प्रांतरचनेचा अहवाल रेडिओवरून घोषित केला.
बेळगावसह मराठी मुलुख म्हैसूर प्रांतात डांबण्यात आल्याने बेळगावमध्ये गोंधळ उडाला. 17 जानेवारी रोजी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले. तर अनेकांनी तुरुंगामध्ये शेवटचा श्वास घेतला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी 106 हुतात्मे झाले. त्यामुळे या सर्व हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जावू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, शहर म. ए. समितीचे बी. ए. येतोजी, ज्येष्ठ कार्यकर्ते रामा शिंदोळकर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी महापौर किरण सायनाक, माजी नगरसेवक सुधा भातकांडे, नगरसेविका वैशाली भातकांडे, तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री, शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, दीपा कुडची, शिवानी पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमोल देसाई, भागोजी पाटील, रणजित चव्हाण-पाटील, माजी नगरसेवक नेताजी जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडु केरवाडकर, माजी ता. पं. सदस्य मारुती मरगाण्णाचे, माजी नगरसेवक संजय शिंदे, धनराज गवळी, नारायण किटवाडकर, मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, शहापूर म. ए. समितीचे शिवाजी हावळाण्णाचे, गजानन शहापूरकर, सुनील बोकडे, अभिजित मजुकर, रणजित हावळाण्णाचे, युवा समितीचे उपाध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, बापू भडांगे, साईनाथ जाधव, बापू जाधव, विनायक कोवाडकर, प्रवीण रेडेकर, सिद्धार्थ भातकांडे, सचिन केळवेकर, राहुल भोसले, बाळासाहेब
काकतकर, माजी नगरसेवक अॅड. रतन मासेकर, दिनेश रावळ, पंढरी परब, राकेश पलंगे, गजानन धामणेकर, साईनाथ शिरोडकर, मोतेश बार्देशकर, सागर पाटील, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत केंडुसकर, महादेव पाटील, चंद्रकांत कोंडुसकर, मनोहर पाटील, दत्ता उघाडे, प्रकाश राऊत, मयुरेश काकतकर, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, सचिन गोरले, दिलीप बैलूरकर, प्रवीण तेजम, महेश टंकसाळी, दत्ता पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. मदन बामणे यांनी सूत्रसंचालन केले.
कर्नाटक सरकारचा करण्यात आला निषेध
सीमातज्ञ समितीचे अध्यक्ष व हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. त्यामुळे त्यांनी सोमवारी बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भात माहिती पाठविली होती. प्रारंभी पोलिसांनी तोंडी परवानगी दिली. परंतु रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्रक काढत खासदार धैयशील मानेंसाठी जिल्हा प्रवेश बंदीचा आदेश बजावला. ही घटनेची पायमल्ली असून, म. ए. समितीच्यावतीने कर्नाटक सरकारच्या या कृतीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.