अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 16 जून 2021, सकाळी 9.15
● सातारा, कराड, फलटण, खटावचा धोका आहेच ● 15 दिवसात सातारा 2947, कराड 2700 ● बुधवारी जिल्ह्यात नव्याने वाढले 970 रूग्ण ● मृत्यू दर कमी करण्याचे आव्हान कायम
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख सोमवारी 626 वर आल्याने दिलासा मिळाला. मात्र मंगळवारी पुन्हा रूग्णवाढीच्या आकड्याने उसळी घेत 832 वर पोहचला. त्यामुळे अपवाद वगळता गेल्या पंधरा दिवसातील रूग्णवाढीचा आलेख 800 ते 900 च्या दरम्यान कायम आहे. तर बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात 970 रूग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात सातारा, कराड, खटाव, फलटण या तालुक्यातील वेगाने होणारी रूग्णवाढ काही प्रमाणात मंदावली असली तरी पुर्णता टळलेला नाही. शिवाय मृत्यूदर अपेक्षित कमी झालेला नाही. त्यामुळे या चार तालुक्यात अजुनही काटेकोर नियमांचे पालन व नियम मोडणारांवर कारवाईची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात 970 नव्या रूग्णांची भर पडली असून सध्या एकूण रूग्णसंख्या 1 लाख 82 हजार 970 वर पोहचली आहे.
चार तालुक्यात वाढ मंदावतेय; पण काळजी गरजेची
जिल्ह्यात दुसरी लाट सुरू झाल्यानंतर कोरोनाने सर्वात जास्त हातपाय पसरले ते सातारा, कराड, फलटण आणि खटाव तालुक्यात. कोरेेगांवसह इतर तालुक्यातही रूग्णवाढीने जनजीवन विस्कळीत केले होतेच मात्र एप्रिल, मे महिन्यात सर्वात जास्त फटका या चार तालुक्यांना बसला. जून महिन्यात हे चारही तालुके काही प्रमाणात सावरले. जून महिन्याच्या पंधरा दिवसात सातारा तालुक्यात 2947 रूग्णवाढ झाली. जूनच्या 1 तारखेला या तालुक्यात सर्वात जास्त 345 रूग्ण वाढले तर 8 जूनला सर्वात कमी 133 रूग्ण वाढले. कराड तालुक्यात 2700 रूग्ण पंधरा दिवसात वाढले. या तालुक्यात 3 जूनला 253 एवढे सर्वात जास्त रूग्ण वाढले तर 14 तारखेला सर्वात कमी 93 रूग्ण वाढले. फलटण तालुक्यात 1701 रूग्णांची वाढ झाली या तालुक्यात 1 जूनला सर्वात जास्त 339 रूग्ण वाढले तर 13 जूनला फक्त 36 रूग्ण वाढले. खटाव तालुक्यात 15 दिवसात 2218 रूग्ण वाढले. या तालुक्यात 4 जूनला 249 एवढे सर्वात जास्त रूग्ण वाढले.
मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न
जिल्ह्यात सातारा, कराड, फलटण,खटाव या तालुक्यात रूग्णवाढ ज्या वेगाने होती तशी मृत्यू होणारांची संख्याही चिंताजनक होती. मात्र जून महिन्यात यावर काहीप्रमाणता नियंत्रण आले आहे. विशेषतः फलटण व खटाव तालुक्यातील मृत्यूदर आटोक्यात आला आहे. मात्र सातारा व कराड तालुक्यातील मृत्यूसंख्या रोखण्यासाठी आरोग्य व्यवस्थेला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. जून महिन्याच्या 15 दिवसात सातारा तालुक्यात 121 कोरोना रूग्णांचे मृत्यू झाले. कराड तालुक्यात 79 रूग्णांचे मृत्यू झाले. खटाव तालुक्यात 39 तर फलटण तालुक्यात 19 रूग्णांचे मृत्यू झाले. एप्रिल, मे महिन्याच्या तुलनेत मृत्यूदराचा आलेखही कमी होत असला तरी तो आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने 9,27,451, एकूण बाधित 1,82,970, एकूण कोरोनामुक्त 1,69,596, मृत्यू 4,094, उपचारार्थ रुग्ण 9482
मंगळवारी जिल्हय़ात बाधित 970, मुक्त 1,587, बळी 29