खटाव :
खटाव येथील जवान अजिंक्य किसन राऊत (वय 27) यांना (सिकंदराबाद) येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच खटाव तालुक्यावर शोककळा पसरली. काल रात्री खटावमधून ‘अमर रहे, अमर रहे.. अजिंक्य राऊत अमर रहे’ च्या घोषणा देत त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अजिंक्य राऊत यांचे माध्यमिक शिक्षण श्री लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूलमध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षण शहाजीराजे महाविद्यालय खटाव येथे झाले होते. सन 2014 मध्ये ते आर्मीमध्ये भरती झाले. अजिंक्य सिकंदराबाद येथील आर्मी मेडिकल कोरमध्ये सक्रिय होते. दरम्यान 2018 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. काल अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियाद्वारे खटावमध्ये वाऱयासारखी पसरली अन् गावावर शोककळा पसरली.
अजिंक्य यांचे पार्थिक गावात दाखल झाल्यानंतर खटावमधून ‘अमर रहे, अमर रहे.. अजिंक्य राऊत अमर रहे’ च्या घोषणा देत त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. रात्री उशिरा येथील पिंपळेश्वर मंदिर परिसरात साश्रू पूर्ण नयनांनी वीर जवान अजिंक्य राऊत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.