मार्केट पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंद
प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचा अवमान केल्यानंतर समस्त मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शुक्रवारी रात्री धर्मवीर संभाजी चौक येथे आंदोलन छेडले. शहरात अनेक ठिकाणी वादावादी झाली. त्यानंतर पोलिसांनी मार्केट पोलीस स्थानकामध्ये 27 जणांवर गुन्हा दाखल केला. त्यांना शनिवारी अटक करून जेएमएफसी द्वितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या सर्वांची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.
मार्केट पोलिसांनी शुभम शेळके, रमाकांत कोंडुसकर, अंकुश केसरकर, नरेश निलजकर, मेघराज गुरव, विनायक सुतार, सुनील लोहार, नागेश काशिलकर, रोहित माळगी, विनायक सुतार, गजानन जाधव, विनायक उर्फ मायाप्पा कोकितकर, दयानंद बडसकर, सूरज गायकवाड, राहुल बराळे, महेश मुतगेकर, राहुल सावंत, सिद्धू उर्फ श्रीधर गेंजी, गणेश येळ्ळूरकर, विक्की मंडोळकर, भालचंद्र बडसकर, विनायक हुलजी, राज गुरव, हरिष मुतगेकर, लोकनाथ रजपूत, भरत मेणसे यांच्यावर गुन्हे दाखल केले.
पोलिसांनी या सर्वांवर भा.दं.वि. 147, 148, 307, 353, 332, 153, 336, 427, 435, 109, 504, 506 सहकलम 149 सेक्शन 2 ए केपीडीपी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. या सर्वांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे, ऍड. शंकर पाटील हे काम पाहत आहेत.
न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त
या सर्व कार्यकर्त्यांना न्यायालयामध्ये हजर करणार म्हणून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस फौजफाटा तैनात करून या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर तातडीने त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.