न्यायालयात चहाच्या टपरीवर काम करणाऱया तरुणाला पाहून वकीलही झाले थक्क : तरुणाची सर्व बोटे नैसर्गिकच
प्रतिनिधी / बेळगाव
ऋतिक रोशनच्या एका हाताला सहा बोटे आहेत, त्याची बातमी झाली. परंतु बेळगाव न्यायालयात वकिलाला चहा देणाऱया तरुणाला 24 बोटे असल्याचे बुधवारी निदर्शनास आले. तरुणाच्या दोन्ही हातांना मिळून बारा आणि दोन्ही पायांना मिळून बारा बोटे असल्याचे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तो न्यायालयाच्या आवारात एक चर्चेचा विषय झाला असून निसर्गाचा चमत्कार असल्याचे बोलले जात आहे. जक्कनायकनकोप्प (ता. बैलहोंगल) येथील भीमरायाप्पा उर्फ रवी विराप्पा तळवार (वय 19) हा तरुण एका कॅन्टीनमध्ये कामाला आहे. आता न्यायालयातील कॅन्टीन बंद झाल्याने एका चहा टपरीवर काम करतो. तो न्यायालयात वकिलांना तसेच इतर कर्मचाऱयांना चहा देतो. यावेळी वकिलांनी त्याच्या हाताला सहा बोटे आहेत हे पाहून विचारता दोन्ही हातांबरोबर पायांनाही सहा-सहा बोटे असल्याचे त्याने सांगितले. पहिल्यांदाच अशा प्रकारे आम्ही पाहत आहोत, अशा प्रतिक्रिया यावेळी उमटत होत्या. महत्त्वाचे म्हणजे सर्व बोटे नैसर्गिक आहेत. त्याला त्यापासून कोणतीच अडचण येत नाही. सहा बोटे असल्यामुळे उलट हाताच्या तळाचा आकारही मोठा आहे. कोणतेही वजन किंवा इतर वस्तू उचलताना मदतच होत असल्याचे त्याने सांगितले. अत्यंत क्वचितच अशा प्रकारे बोटे असल्याचे बोलले जात आहे. एका हाताला सहा बोटे किंवा एका पायाला सहा बोटे किंवा चार बोटे असणारीही व्यक्ती बऱयाच वेळा आढळते. केवळ मनुष्य प्राण्यांमध्येच नाही तर इतर प्राण्यांमध्येही अशा बऱयाच चमत्कारिक गोष्टी दिसून येतात. त्याबद्दल नेहमीच चर्चादेखील होते. काही जण दैवी तर काही जण निसर्गाचा चमत्कार असे म्हणून चर्चा करत असतात. बऱयाच वेळा अशा लोकांचा उपयोग करून मदत मागत असतात आणि सर्वसामान्य जनताही मदत करत असते. 21 बोटे असणारे बऱयाच वेळा आढळतात. त्याबद्दल कुणाला कुतूहल वाटत नाही. मात्र न्यायालयात चहाच्या टपरीवर काम करणाऱया या तरुणाला तब्बल 24 बोटे असल्याने येथे हा एक चर्चेचाच विषय बनला आहे.