जीवितहानीबाबत संभ्रम : अमेरिकन आर्मीकडून शोधकार्य
काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतामध्ये सोमवारी दुपारी एक विमान कोसळले. तालिबानचे वर्चस्व असलेल्या भागात दुपारी एक वाजून 10 मिनिटांनी हे विमान कोसळल्याची माहिती गझनी प्रांताच्या गव्हर्नरांचे प्रवक्ते अरीफ नुरी यांनी दिली. मात्र, सदर विमान प्रवासी होते की अन्य स्वरुपाचे होते याबाबत कोणतीही स्पष्टोक्ती न दिल्यामुळे जीवितहानीची तीव्रता स्पष्ट होऊ शकली नाही. अमेरिकन आर्मीने अपघातग्रस्त विमानाचा शोध सुरू केला असला तरी त्यांनीही याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दर्शवल्यामुळे दुर्घटनेची व्याप्ती लक्षात आलेली नाही. काही प्रसारमाध्यमांनी या दुर्घटनेमध्ये जवळपास 83 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला असला तरी त्याबाबत संभ्रमावस्था कायम आहे.
अफगाणमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर विमान एरियाना एअरलाईन्सचे असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र एरियाना कंपनीने विमान कोसळल्याचे वृत्त फेटाळत आपली सर्व विमाने सुस्थितीत असल्याचा दावा केल्यामुळे संभ्रमावस्था वाढली आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान्यांचे साम्राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱया गझनी प्रांतातील देह याक जिल्हय़ातील सादो खेल भागात हा अपघात झाला.
…………….