वृत्तसंस्था/ मिशिगन
अमेरिकेच्या मिशिगन येथील एका शाळेत एका विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि एका शिक्षकासह 8 जण जखमी झाले आहेत. मिशिगनच्या ऑक्सफोर्ड हायस्कुलमध्ये ही घटना स्थानिक प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी घडली आहे. हल्ला करणारा 15 वर्षीय विद्यार्थी याच शाळेत शिकत होता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
ओकलँड काउंटीचे अंडरशेरिफ मायकल जी. मॅककेबे यांच्यानुसार मृत विद्यार्थ्यांमध्ये 16 वर्षीय मुलासमवेत 14 तसेच 17 वर्षीय मुलींचा समावश आहे. गोळी लागल्याने 8 जण जखमी झाले असून यात एक शिक्षक सामील आहे. मारले गेलेल्या तिन्ही विद्यार्थ्यांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आले का ते बेछूट गोळीबाराला बळी पडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शाळेत अजून कुणी अडकून पडलेले नाही हे तपासण्यासाठी पूर्ण परिसराची झडती घेण्यात आल्याचे मॅककेबे यांनी सांगितले.
गोळीबार करणाऱया विद्यार्थ्याकडून एक पिस्तुल हस्तगत करण्यात आले. शाळेत अनेक रिकामी काडतूसे मिळाली आहेत. गोळीबाराचे वृत्त मिळताच 25 यंत्रणा तसेच 60 रुग्णवाहिकांना बचावकार्यात सामील करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना माहिती देण्यात आली. शाळेतून बाहेर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नातलगांसोबत एका स्टोअरमध्ये हलविण्यात आले.
परिसरातील सर्व शाळा बंद ऑक्सफोर्ड हायस्कुलचे विद्यार्थी आणि कर्मचाऱयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. तसेच परिसरातील सर्व शाळा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. अमेरिकेच्या इतिहासात शाळेतील सर्वात घातक गोळीबार एप्रिल 2007 मध्ये व्हर्जिनियाच्या ब्लॅक्सबर्गमध्ये झाला होता. यात 33 जण मारले गेले होते.