ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावरून भारत आणि चीनमधील तणाव वाढल्याने अमेरिकेने भारताच्या मदतीसाठी पॅसिफिक महासागरात तीन विमानवाहू नौका तैनात केल्या आहेत. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अमेरिकन नौसेनेची क्रूझर जहाजे, विध्वंसक जहाजे, युद्ध विमाने आणि इतर सहाय्यक विमानांनी सुसज्ज अशा तीन युद्धनौका पॅसिफिक महासागरामध्ये दिसून आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून या विमानवाहू नौका पॅसिफिक महासागरामध्ये चीनच्या समुद्र सीमांपासून काही अंतरावर गस्त घालत आहेत.
कोरोनामुळे चीन आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला.अशा परिस्थितीत अमेरिकेने भारताला जाहीर पाठिंबा दिला आहे. भारताच्या मदतीसाठी अमेरिकेने ही जहाजे तैनात केली आहेत, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावरून निर्माण झालेला तणाव आता कमी झाला असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितले.