’गोवा व्हिजन प्लॅन’ चे करणार प्रकाशन
प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज शनिवारी गोव्यात दाखल होत असून येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ’गोवा व्हिजन प्लॅन’ चे प्रकाशन करणार आहेत. आपचे सरकार आल्यास राज्यात ’भ्रष्टाचारमुक्त प्रशासन’ देण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी यापूर्वीच दिलेले आहे.
केजरीवाल यांचे शनिवारी दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर पक्षाच्या नेत्यांसोबत सांत आंदे, कुठ्ठाळी आणि शिरोडा या मतदारसंघाना भेट देऊन येथे घरोघरी प्रचारात सहभागी होणार आहेत.
आपने गेल्या आठवडय़ात घरोघरी प्र्रचाराची प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. आता कोविड मार्गदर्शक तत्त्वे आणि निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार घरोघरी प्रचार करणार आहेत.
केजरीवाल यांनी डिसेंबरमध्ये गोव्यात महासभेला हजेरी लावली होती. त्यात हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी बोलताना, आपचे सरकार आल्यास राज्याचे पहिले ’भ्रष्टाचारमुक्त’ सरकार स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते.
केजरीवाल यांनी आतापर्यंत राज्याला सहा हमीभाव जाहीर केले आहेत. त्यात दरमहा 300 युनिटपर्यंत वीज मोफत, तीर्थयात्रा, रोजगार हमी, 18 वर्षांवरील प्रत्येक महिलेला दरमहा 1000 ची हमी, दरमहा रु. 2500 गृह आधार भत्ता, यांचा समावेश आहे. त्याशिवाय टॅक्सी ऑपरेटर्ससाठी महामंडळ आणि फेसलेस आरटीओ सेवा याचाही समावेश आहे. आज होणाऱया भेटीदरम्यान श्री. केजरीवाल केजरीवाल ’गोवा व्हिजन प्लॅन’ चे अनावरण करणार आहेत.