देशातील सर्वात मोठी कारवाई
प्रतिनिधी / कोल्हापूर
अलिशान कार चोरून त्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकात विक्री करणाऱया आंतरराज्य टोळीला कोल्हापूर पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल विविध मॉडेलच्या तब्बल 31 अलिशान कार हस्तगत केल्या. या सर्व कारची किंमत तब्बल 5 कोटी 5 लाख, 50 हजार रूपये इतकी आहे. टोळीचा पर्दाफाश करताना पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. तिनही आरोपी बेळगाव जिल्हय़ातील आहे. जहीरअब्बास अब्दुलकरीम दुकानदार (वय 42, रा. 7 क्रॉस मस्जिद गल्ली, न्यू गांधीनगर, बेळगाव, जि. बेळगाव), यश प्रशांत देसाई (वय 26, रा. घर नंबर 519, बोरमाळ बोळ गल्ली, शहापूर, ता. जि. बेळगाव) आणि खलीद महम्मद लियाकत सारवान (वय 40, रा. प्लॉट नंबर 25, सुभाष नगर, ता. जि. बेळगाव, कर्नाटक) अशी अटक केलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.
एमआयडीसी पहिला फाटा नागाव (ता. हातकणंगले) येथील महिंद्रा लॉजिस्टिक या कंपनीतून 4 ते 5 जानेवारी रोजी स्वीफ्ट डिझायर व्हीडीआय कार (क्रमांक एमएच-09-ई के-9126) चोरीला गेल्याची फिर्याद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार गुन्हा नोंद झाला होता. कार चोरींचे वाढते प्रमाण आणि शिरोलीतील या कारच्या चोरीच्या गुन्हय़ानंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱयांना सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव आणि त्यांच्या टीमने तपास सुरू केला होता.
अंमलदाराला मिळालेल्या टिपने केला गुन्हय़ाचा पर्दाफाश
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची चक्रे सुरू केली. दरम्यान, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी यांना एक टिप मिळाली. या टिपने कार चोराच्या टोळीचा पर्दाफाश झाला. खबऱयाने जहीर्ब्बास दुकानदार नागाव येथील कंपनीतून चोरलेली कार विक्री करण्यासाठी कोदाळी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील ग्रीन हिल नामक एका रिसॉर्टवर 6 जानेवारीला येणार असल्याचे खबऱ्याने कोळी यांना सांगितले. ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली टीम निवडून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, असिफ कलायगार, सुरेश पाटील, विनोद कांबळे, अनिल जाधव, संजय पडवळ, अनिल पास्ते, संतोष पाटील, राजेंद्र वरंडेकर या टिमने कोराळी येथील ग्रीन हिल रिसॉर्टच्या पार्किंगमध्ये सापळा रचला.
कोदाळीच्या रिसॉर्टवरून 13 कार हस्तगत
खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या रिसॉर्टवर जहीर अब्बास अब्दुलकरीम दुकानदार, यश प्रशांत देसाई आणि खलीद महम्मद लियाकत सारवान हे तीन संशयित कार चोरटे आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नागाव येथून चोरलेल्या कारसह इतर राज्यातून चोरलेल्या सात कार हस्तगत केल्या. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर सारवानकडून आणखीन पाच अशा एकूण 13 कार हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या टीमला यश आले.
आणखीन 18 कारही हस्तगत
अटक केलेल्या तिन्ही आरोपींनी आकाश देसाई याच्या सांगण्यावरून कर्नाटक आणि महाराष्ट्रात आणखीन 18 कार विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामध्ये 1 फॉरच्युनर कार, 8 इनोव्हा, 3 हय़ुडांई क्रेटा, 2 ब्रिझा, 4 स्वीफ्ट डिझायर या कारचा समावेश असून या कार पोलिसांनी हस्तगत केल्या असून त्यांच्या मालकांचा शोध सुरू केला आहे.
कार चोरीचे शहापूर कनेक्शन
अटक केलेल्या तीन संशयित आरोपींकडे कसून चौकशी केल्यानंतर ते बोलू लागले. आरोपींपैकी यश देसाई याचा चुलता आकाश भालचंद्र देसाई (रा. शहापूर, जि. बेळगाव) हा कर्नाटक पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने कोदाळी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील ज्या ठिकाणी आरोपींना अटक केली ते ग्रीन हिल रिसॉर्ट चालविण्यास घेतले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अधिकाऱयांना मिळाली. आकाश देसाई याचा मणिपूर राज्यातील राजकुमार किरण सिंग नामक साथीदार आहे. तो परराज्यातील कार चोरून आणतो. त्याने आणलेल्या कार नंबरमध्ये खाडाखोड, फेरबल करून आकाश देसाई आपल्या हस्तकांकरवी महाराष्ट्र आणि कर्नाटकात विक्री करतो, अशी माहिती चौकशीत पुढे आली. त्यामुळे कार चोरीचे कनेक्शन शहापूर, कोदाळी आणि मणिपूरपर्यंत जावून पोहचले.
ग्रीन हिल रिसॉर्ट कार विक्रीचे केंद्र
आकाश देसाई हा आपण चालविण्यास घेतलेल्या ग्रीन हिल रिसॉर्टमध्ये ठेवत असे. तेथून या कार अटक केलेल्या संशयित आरोपींच्या माध्यमातून कर्नाटक आणि महाराष्ट्रात अत्यंत खुबीने विक्री करत असे.
आरोपींकडून हस्तगत केलेल्या 31 कार अशा
कारचे नाव संख्या
फॉरच्युनर 3
इनोव्हा 9
किया सेल्टॉस 3
हय़ुडांई क्रेटा 7
इरटिगा 1
स्कॉर्पिओ 1
ब्रिझा 2
स्वीफ्ट डिझायर 5
देशातील सर्वात मोठी कारवाई
एकाचवेळी चोरीस गेलेल्या 31 कार हस्तगत करून आरोपींनाही अटक करण्याची कामगिरी कोल्हापूर पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टीमने केली. विशेष म्हणजे एकाचवेळी एवढय़ा मोठय़ा संख्येने कार हस्तगत करण्याची ही कारवाई कदाचित देशातील सर्वांत मोठी कारवाई ठरावी, अशी आहे.
टोळीतील इतरांचाही शोध सुरू
अटक केलेल्या तीन कार चोरटय़ांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्यावर नागाव येथील कार चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर इतर ठिकाणी आणि इतर राज्यात दाखल असलेल्या गुन्हय़ांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या टोळी आणखीन कुणी गुन्हेगार आहेत काय? याचाही शोध सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तपासात मणिपूरसह इतर राज्यातही या टोळीने फसवणूक केल्याची शक्यता असून त्या दृष्टीनेही पोलिसांनी तपासाची चक्रे सुरू केली आहेत.
आरोपींवर दिल्ली, हरियाणात गुन्हे दाखल
अटक केलेल्या आरोपींवर 2020, 2021 आणि 2022 या वर्षांत शिरोली एमआयडीसी कोल्हापूरसह मंगोलपुरी, दिल्ली, मधुविहार, ईस्ट दिल्ली, पटेलनगर, दिल्ली, सेक्टर 5 गुरगाव हरियाणा, वसंत प्रुज नॉर्थ साऊथ वेस्ट दिल्ली, के.एम. पूर साऊथ दिल्ली, डिफेन्स कॉलनी साऊथ दिल्ली, नरेला आऊटर, नॉर्थ दिल्ली, पश्चिम विहार ईस्ट दिल्ली, मंगोलपुरी, दिल्ली, केशव पुरम नॉर्थ वेस्ट दिल्ली, विवेक विहार शहदारा, दिल्ली या 13 पोलीस ठाण्यात कार चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहितीही स्थानिक गुन्हे अन्वेष्ण शाखेने दिली.
राम कोळींचा विशेष सत्कार
राम कोळी यांना त्यांच्या बातमीदाराने दिलेल्या माहितीवरुनच या टोळीचा पर्दाफाश करण्यात कोल्हापूर पोलीस दलास यश आले. यामुळे पोलीस कॉन्स्टेबल राम कोळी यांचा जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.