– कोरोना सेंटरमधील प्रकार, राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ वसतीगृहामध्ये खासगी संस्थेकडून सुरु असलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी येथील वॉर्डबॉयवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अंकुश मछिंद्र पवार (वय 21, रा. तीनबत्ती चौक, दौलतनगर राजारामपुरी) असे वॉर्डबॉयचे नाव आहे. अवनी संस्थेच्या अधीक्षिका तेजश्री सुतार यांनी याबाबतची फिर्याद दिली होती.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अवनी संस्थेतील एका अल्पवयीन मुलीला कोरोनाची लागण झाली. तिला शिवाजी विद्यापीठ येथील कोवीड सेंटरमध्ये 20 मे रोजी उपचारासाठी दाखल केले. या सेंटरमध्ये अंकुश हा वॉर्डबॉय म्हणून कामास होता. तो या अल्पवयीन मुलीकडे वरचेवर येत होता. विवाहित असूनही त्याने अविवाहीत असल्याचे पीडीतेला खोटे सांगितले. पीडीत मुलगी अनाथ असल्याचा फायदा घेत वॉर्डबॉयने 29 मे रोजी रात्री कोवीड सेंटरमध्ये अत्याचार केला.
पीडीतेने घडलेला प्रकार अवनीच्या उपधीक्षिका अनुराधा भोसले यांना सांगितला. भोसले यांनी मंगळवार पेठेतील बालकल्याण समितीला या प्रकाराची माहिती दिली. समितीने सत्यता तपासून अवनी संस्थेच्या अध्यक्षा तेजश्री सुतार यांना फिर्याद देण्यास सांगितले. त्यानुसार सुतार यांनी 16 जून रोजी राजारामपुरी पोलीस ठाण्यात वॉर्डबॉय विरोधात फिर्याद दिली. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एल. डुबल, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपिका जौंजाळ, पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी कोरोना सेंटरला भेट देऊन घडल्या प्रकाराची माहिती घेतली. यानंतर वॉर्डबॉल अंकुश याला ताब्यात घेतले.