प्रतिनिधी /बेळगाव
अशोकनगर येथील एका रहिवाशाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री खानापूरजवळ घडली आहे. शुक्रवारी यासंबंधी दोघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
गौतम भीमाशंकर सुधाकर (वय 52, रा. अशोकनगर) असे त्यांचे नाव आहे. गुरुवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास खानापूर रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱया गौतम यांना 108 रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात गौतम यांच्या भावासह दोघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दोघा जणांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे गौतम यांनी चिठ्ठी लिहिली आहे. ही चिठ्ठी व्हॉट्सऍपवरून त्यांनी आपल्या पत्नीला पाठविली आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम हे गुरुवारी सकाळपासूनच आपल्या घरातून बाहेर पडले होते. मिळकतीच्या वादातून भावासह दोघा जणांनी केलेल्या त्रासामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत उल्लेख केला आहे. शुक्रवारी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहेत.