प्रतिनिधी/ सातारा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजपने महाराष्ट्र भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने राज्यस्तरीय शिवगान स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धेची जिल्हास्तरीय प्राथमिक फेरी आज दि. 9 रोजी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सातारा जिह्यातून सामूहिक शिवगान आणि वैयक्तिक शिवगान या स्पर्धेसाठी 68 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
या स्पर्धेमध्ये सातारा जिह्यातील जिजामाता ज्युनियर कॉलेज, श्रीपतराव पाटील हायस्कूल, लोकमंगल हायस्कूल एमआयडीसी, लोकमंगल हायस्कूल नागेवाडी, प्रिया दर्शन गर्ल्स हायस्कुल भुईंज, कन्या शाळा सातारा, रंगराव देशमुख परळी, अण्णासाहेब कल्याणी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल यांनी सहभाग घेतला आहे. अशी माहिती भा.ज.पा सांस्कृतिक प्रकोष्ठ चे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण आणि पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक शिरीष चिटणीस यांनी दिली. या स्पर्धेच्या शुभारंभासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, सातारा नगरपरिषद अध्यक्ष मनोज शेंडे, भाजपाचे भरत पाटील, विनीत कुबेर, अमोल सणस, विकास गोसावी, विकास आंबेकर, मनोज घोरपडे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.