गोव्यातील पहिली ’डिजिटल डोअर टू डोअर’ मोहीम प्रारंभ
प्रतिनिधी /पणजी
निवडणूक प्रचारात आणखी एक आघाडी घेताना आम आदमी पार्टीतर्फे गोव्यातील पहिली डिजिटल डोअर-टू-डोअर मोहीम प्रारंभ करण्यात आली. अश्या पद्धतीने हायटेक प्रचार मोहीम सुरु करणारा आप हा पहिला पक्ष ठरला आहे.
पणजीत पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गोवा डेस्क प्रभारी आतिशी आणि पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अमित पालेकर यांनी सोमवारी या प्रचार मोहिमेचा प्रारंभ केला. लोक ’एक चान्स केजरीवालाक डॉट कॉम’ या पेजला भेट देऊ शकतात किंवा 7277972779 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकतात. तेथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उमेदवार ऍड. पालेकर हे राज्यासाठी व्हिजन स्पष्ट करणार आहेत.
पक्षाची आश्वासने आणि हमी मोठय़ा प्रमाणात मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी ’आप’ने यापूर्वी परिवर्तन यात्रा आणि रोजगार यात्रा काढल्या होत्या. ’आप’ने घरोघरी जाऊन देखील प्रचार केला आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे अशक्मय असल्याने डिजिटल डोअर-टू-डोअर मोहीम सुरू केली आहे.
त्यानुसार पक्षाचे ’13-सूत्री गोवा मॉडेल’, तसेच आपने दिल्लीत केलेले काम समजावून सांगतील. तेथे लोकांना प्रश्नही विचारता येईल व सूचना देता येतील. हे लॅपटॉप, मोबाइल डिव्हाइस किंवा टॅबद्वारे ऍक्सेस केले जाऊ शकते अशी माहिती अतिशी यांनी दिली.
गोव्यात लोक काम करणारे सरकार शोधत आहेत. शिक्षण, आरोग्य पायाभूत सुविधा आणि अखंडित वीज व पाणी यांसह मूलभूत सुविधांच्या अभावामुळे लोक संताप व्यक्त करत आहेत, असे आतिशी यांनी पुढे सांगितले.