नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या सूचना
प्रतिनिधी / फोंडा
तोंडावर आलेला पावसाळा व नुकतेच येऊन गेलेले चक्रीवादळ आणि कोरोनाचे वाढते संक्रमण या पार्श्वभुमीवर फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांनी फोंडा व कुर्टी भागातील मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम व इतर संबंधीत खात्याच्या अधिकाऱयांशी गटारकामे व नागरिकांना भेडसावणाऱया समस्यांवर चर्चा करुन तात्काळ उपाययोजना आखण्याच्या सूचना केल्या.
फोंडा मतदारसंघात विविध ठिकाणी पावसाळय़ात पाणी साचून निर्माण होणाऱया समस्यांचा पाठपुरावा करुन ठिकठिकाणी वाढलेली झाडे कापून टाकण्याची सूचना आमदार रवी नाईक यांनी केली. नाला व तुंबलेल्या गटारांच्या साफसफाईचे आदेशही देण्यात आले. कुटी-खांडेपार पंचायत क्षेत्रातील हाऊसिंग बोर्ड रहिवासी कॉलनीमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी काही घरांपर्यंत पाणी पोचते. त्यावर उपाय म्हणून संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव आहे. काही ठिकाणी नाल्याचे बांधकाम झाले नसल्याने पुराचे पाणी थेट घरात शिरते. स्थानिकांच्या मागणीनुसार संरक्षक भिंतीच्या कामाचा आमदार रवी नाईक यांनी पाठपुरावा केला. सपना पार्क, प्रभुनगर भागात दरवर्षी पावसाळय़ात मुख्य रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. आसपासच्या दुकानतही पाणी शिरते. पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होत नसल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. याठिकाणी रस्ता सखल भागात असल्याने जोरदार पावसाच्यावेळी संपूर्ण रस्ता पाण्याखाली जातो. पावसाळय़ापूर्वी याठिकाणी योग्य उपाययोजना करण्याची सूचना रवी नाईक यांनी केली.
प्रभुनगर भागातील मैदानाची संरक्षक भिंत व येथील घरांना निर्माण झालेला धोका यासंबंधीही पाहणी करुन तोडगा काढण्याची सूचना बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांना करण्यात आली. यावेळी फोंडा पालीकेचे नगरसेवक रितेश नाईक, आनंद नाईक तसेच पंचायत प्रतिनिधी उपस्थित होते.
फोंडय़ातील विविध भागात मलनिस्सारण प्रकल्प, गॅसवाहिन्या व इतर कामामुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आलेले आहेत. पावसाळय़ापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास पावसाळय़ात खराब रस्त्यांमुळे लोकांना प्रचंड त्रास होणार आहे. या खोदकामामुळे ठिकठिकाणी गटारात माती साचून पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण झाले आहे, असे बांधकाम खात्याच्या अधाकाऱयांनी सांगितले.