वृत्तसंस्था /मुंबई
कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने निम्न स्तरावरील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनशी आपल्याला संपर्क करता येत नसल्याची तक्रार केल्याने आयटीएफच्या नियंत्रण समितीने टेनिसपटूंच्या पॅनेलची स्थापना करण्याची घोषणा मंगळवारी केली. विश्व टेनिस टूरच्या स्पर्धेत सहभागी होणाऱया टेनिसपटूंसाठी ही योजना आखण्यात आली आहे.
आयटीएफ विश्व टेनिस टूरतर्फे निम्नस्तरीय व्यावसायिक स्पर्धा घेतल्या जातात कनिष्ठ आणि वरिष्ठांच्या टेनिस सर्कीटमध्ये खेळणाऱया टेनिसपटूंना व्यावसायिक स्तरावरील टेनिस स्पर्धामध्ये अधिक संधी मिळावी. तसेच अशा टेनिसपटूंना पुरूषांच्या एटीपी आणि महिलांच्या डब्ल्यूटीए टूरवरील टेनिस स्पर्धामध्ये खेळण्याची संधी दिली जात आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासूनच टेनिस सर्कीट पूर्णता बंद करण्यात आले आहे.
जॉर्जियाची महिला टेनिसपटू सोफिया शेपाटेव्हा हिने आयटीएफकडे आर्थिक मदतीसाठी अर्ज दिला आहे. तथापि आयटीएफने व्यावसायिक गटातील मानांकन यादीतील तळाच्या क्रमांकावर असलेल्या टेनिसपटूंशी अधिक सुलभरित्या संपर्क साधता यावा यासाठी ही नवी योजना अंमलात आणली आहे. एटीपी आणि डब्ल्यूटीए संघटनेतील निवडून आलेल्या सदस्यांचा या पॅनेलमध्ये दोन वर्षांच्या कालावधीसाठी समावेश केला जाईल. या पॅनेलकडे सल्ला आणि शिफारस विश्व टेनिस टूर समितीला करण्याचे अधिकार दिले आहेत.