रायपूर
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्हय़ात सोनपूर भागात सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. या दुर्घटनेत आयटीबीपी 53 बटालियनच्या ‘ए’ कंपनीचा एक वरिष्ठ अधिकारी हुतात्मा झाला, तर अन्य एक जवान जखमी झाला. जखमी जवानाला उपचारासाठी एअरलिफ्ट करण्यात आले होते. सुरक्षा पथकाच्या नियमित गस्तीदरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केल्याने ही दुर्घटना घडल्याचे नारायणपूरचे पोलीसप्रमुख सदानंद कुमार यांनी स्पष्ट केले. हुतात्मा झालेला अधिकारी असिस्टंट सब-इन्स्पेक्टर दर्जाचा असल्याचे सांगण्यात आले. राजेंद्र सिंग असे त्यांचे नाव असून ते उत्तराखंडमधील टेहरी गऱहवाल जिल्हय़ातील असल्याचे सांगण्यात आले. या स्फोटानंतर परिसरातील गस्त वाढविण्यात आली. तसेच माओवाद्यांच्या शोधासाठी शोधमोहीमही हाती घेण्यात आली. मात्र, सायंकाळपर्यंत कोणाचाही मागमूस लागू शकला नाही.