‘पहाडवेल’वर व्यापक प्रयोगांनंतर संशोधकांचे प्रतिपादन, आता प्रतीक्षा सरकारी मान्यतेची
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
साऱया जगाची घडी विस्कटणाऱया कोरोना या विषाणूवर प्रभावी लस आणि औषध शोधण्याचा प्रयत्न जगभर केला जात आहे. भारत सरकारही यात मागे नाही. भारतात हजारो वर्षांपासून उपयोगात आणल्या जाणाऱया आयुर्वेद या उपचारपद्धतीच्या माध्यमातूनही यावर संशोधन करण्यात येत असून ते यशस्वी ठरण्याची सुखद शक्यता निर्माण झाली आहे. भारतात उपलब्ध असलेली ‘धाकटी पाडावळ’ किंवा ‘लहान पहाडवेल’ ही वनस्पती कोरोना बरा करण्यात 98 टक्के यशस्वी ठरते असे व्यापक संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे. या वनस्पतीपासून बनविलेल्या औषधावर आता सर्वंकष वैद्यकीय परीक्षणे करणे आवश्यक असून ती यशस्वी ठरल्यास या औषधाला सरकारची मान्यताही मिळू शकते. हे संशोधन डॉ. मिताली मुखर्जी यांनी पेले असून त्यांनीच अहवाल प्रसिद्ध केला आहे.
या वनस्पतीची मुळे सध्याही ताप, डेंग्यू आणि इतर संसर्गजन्य तापांवर औषध म्हणून उपयोगात आणण्यात येतात. मात्र, त्यांचा कोरोनावर उपाय म्हणूनही प्रभावीपणे उपयोग होऊ शकतो, हे नव्याने सिद्ध झाल्याचे प्रतिपादन करण्यात येत आहे. या वनस्पतीवर व्यापक संशोधक करण्यात आले आहे. सार्स कोव्हीड 2 या कोरोनाच्याच प्रकारातील विषाणूवर ही वनस्पती रामबाण उपाय ठरते, असे दिसून आले आहे. मात्र, हे औषध प्रत्यक्षात रुग्णांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक प्रयोग व परीक्षणे करावी लागणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या वनस्पतीला इंग्रजी भाषेत ‘व्हेलव्हेटलीफ’ असे म्हणतात, अशी माहिती देण्यात आली.
मुळांचा रस गुणकारी
या वनस्पतीच्या मुळांचा रस कोरोना विषाणूंची वाढ रोखण्यात यशस्वी ठरतो. तसेच कोरोना विषाणूंची मारकताही या औषधाने नाहीशी होऊन तो नष्ट होऊ शकतो. यामुळे शरिरातील पेशींना उसंत मिळून त्या कोरोनाचा प्रतिकार करण्यास सबळ होतात. या औषधावरील आतापर्यंतची परीक्षणे उत्साहवर्धक ठरली आहेत. मात्र, या औषधाला अधिकृत मान्यता मिळायची आहे. ती मिळेपर्यंत या वनस्पतीचा उपयोग कोरोना रुग्णांवर करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
काय म्हणतात संशोधक
या वनस्पतीच्या मुळांचा रस घेतल्यास कोरोनाच्या जंतूंची वाढ 55 टक्के रोखली जाते. मात्र या रसापासून तयार हैड्रोक्लोरिक औषधामुळे कोरोनाची वाढ 98 टक्के रोखली जाते. या रसात शुद्ध पाणी आणि अल्कोहॉल शास्त्रीय पद्धतीने मिसळून हे औषध तयार करण्यात येते. केवळ मुळेच नव्हे तर या वनस्पतीच्या अन्य भागांपासून काढलेला रसही सार्स कोव्हीड 2 या विषाणूवर गुणकारी ठरला आहे. सार्स कोव्हीड 2 या विषाणूवर जे औषध गुणकारी असते तेच कोरोनावरही परिणामकारक असते. आतापर्यंत जी औषधे किंवा लसी शोधल्या गेल्या आहेत, त्यांचे प्रयोग सार्स कोव्हीड 2 या विषाणूवरच करण्यात आले आहेत.
कनेक्टिव्हीटी मॅपचा उपयोग
औषधे कशी परिणाम करतात याचा अभ्यास करण्यासाठी ‘कनेक्टिव्हिटी मॅप’चा उपयोग करण्यात येतो. याच माध्यमाचा उपयोग या औषधाची परिणामकारकता अभ्यासण्यासाठीही करण्यात आला. या अभ्यासातून असे दिसून आले की संसर्गजन्य आजारांवर इतर ऍलोपॅथिक औषधे ज्या पद्धतीने कार्य करतात त्याच पद्धतीने हे औषधही प्रभावी ठरते. त्यामुळे या औषधासंबंधीच्या आमच्या आशा पल्लवित झाल्या, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.