प्रतिनिधी/ सातारा
वाठार बुद्रूक (ता. खंडाळा) येथे घडलेल्या खून प्रकरणी अटक केलेल्या ऋषीकेश पायगुडे या संशयिताकडून त्याच्या पुणे जिल्हय़ातील कुडजे गावी जावून त्याने खून करताना वापरलेली दोन पिस्टल, जिवंत काडतूस व मोटारसायकल लोणंद पोलिसांनी जप्त केली आहे.
दि. 8 रोजी लोणंद पोलीस ठाणे हद्दीत वाठार बुद्रुक (ता.खंडाळा) गावच्या हद्दीतील निरा उजवा कॅनॉलमध्ये मंगेश सुरेंद्र पोमण (वय 35 वर्षे रा. पोमणनगर पिंपळे ता. पुरंदर जि. पुणे) याचा अनोळखींनी अज्ञात कारणावरुन खून केला होता. प्रेताचे अंगावरील कपडे फेकून देवून पुरावा नाहीसा करण्यात आला होता. मात्र, लोणंद पोलिसांनी तातडीने या खुनाचा तपास करत गुह्यातील आरोपी वैभव सुभाष जगताप रा. पांगारे (ता. पुरंदर) यास यापुर्वी अटक करण्यात आली असून त्याची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे.
दरम्यान गुह्यातील मुख्य कुख्यात गुंड, तडीपार आरोपी ऋषीकेश दत्तात्रय पायगुडे (रा. कुडजे ता. हवेली जि. पुणे) हा गुन्हा घडल्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, त्याचा ठावठिकाणा काढून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी माहिती काढून त्याला नाशिक येथे स्थानिक पोलिसाच्या मदतीने ताब्यात घेवून अटक केली होती. पोलीस कोठडीत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो पुणे येथून तडीपार असल्याचे निष्पन्न झालेय. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून त्याने खुनाच्या गुह्यात वापरलेले गावठी बनावटीचे दोन पिस्टल, एक जिवंत रांऊड व पल्सर मोटार सायकल जप्त करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांच्यासह उपनिरीक्षक गणेश माने, हवालदार महेश सपकाळ, विठ्ठल काळे, अविनाश नलवडे, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजीत धनवट, सागर धेंडे, अविनाश शिंदे, फैयाज शेख, गोविंद आंधळे, केतन लाळगे, चालक मल्हारी भिसे यांनी ही कारवाई केली. या टीमचे पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी अभिनंदन केले आहे.