क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आय-लीग फुटबॉल स्पर्धेत गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबने आपल्या दुसऱया विजयाची नोंद केली. काल कोलकाताच्या विवेकानंद युवा भारती स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात चर्चिल ब्रदर्सने पंजाब एफसीचा एकमेव गोलने पराभव केला. क्लेवीन जुनिगा याने सामना संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना हा गोल केला.
विजयाच्या तीन गुणानी चर्चिल ब्रदर्सचे आता तीन सामन्यांतून 7 गुण झाले असून ते पहिल्या स्थानावर तर दोन सामन्यात पराभूत झालेल्या पंजाब एफसीचे तीन गुण झाले आहेत. ट्राव आणि मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब यांच्यातील लढत 2-2 अशी बरोबरीत संपली. कोरमॉन तुरसॉनोव्ह आणि हॅल्दर रिबेरोने ट्रावसाठी तर मोहम्मेडनसाठी निखील कदम व हिरा मोंडलने गोल केले. मोहम्मेडनचे आता तीन सामन्यांतून 5 तर ट्रावचे सलग तीन बरोबरीने 3 गुण झाले आहेत.