काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक : वाहनधारकांचे हाल
प्रतिनिधी / बेळगाव
एकीकडे शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विकास साधला जात आहे. दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्यांचे काम हाती घेतल्याने शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील सम्राट अशोक चौक ते आरटीओ सर्कल मार्गावर गुरुवारी वाहतूक कोंडी झाली होती.
शहरात विविध मार्गांवर स्मार्ट सिटीअंतर्गत काँक्रिटीकरण काम सुरू आहे. सम्राट अशोक चौक ते आरटीओ सर्कल या मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीचा ताण वाढला आहे. शिवाय आरटीओ सर्कलमध्ये गटारीचे कामदेखील सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे. शहरात सुरू असलेल्या अर्धवट कामांचा फटकाही वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. विविध मार्गांवर अर्धवट कामे असल्याने वाहनधारकांना अडचणी निर्माण होत आहेत. रस्त्यांवरच दगड व इतर साहित्य पडून असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. आरटीओ कार्यालयाकडे येणाऱया वाहनांची संख्या मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असून यातून मार्ग काढताना वाहनधारकांची दमछाक होत आहे.