क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
आरिदाने सांतानाने 41 सेकंदाच्या आत केलेल्या दोन गोलांच्या बळावर हैदराबाद एफसीने ईस्ट बंगालचा 3-2 गोलांनी पराभव करून हिरो आयएसएल लीग फुटबॉल स्पर्धेत शानदार विजय नोंदविला. काल वास्कोतील टिळक मैदानावर हा सामना खेळविण्यात आला.
हैदराबाद एफसीसाठी आरिदानेच्या दोन गोलांच्या व्यतिरिक्त हालीचरण नर्झारीने एक गोल केला. पराभूत ईस्ट बंगालचे दोन्ही गोल जॅकीस माघोमाने नोंदविले. हैदराबादचा हा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. विजयाच्या तीन गुणांनी त्यांचे आता पाच सामन्यांतून 9 गुण झाले व ते आता पाचव्या स्थानावर गेले आहेत. पाच सामन्यांतील केवळ एका गुणाने ईस्ट बंगालचा संघ अजूनही तळाला म्हणजे अकराव्या स्थानावर आहे.
या सामन्यात 56व्या मिनिटाला आरिदाने सांतानाने दोन गोल केले आणि तेही 41 सेकंदाच्या आत. पहिल्या सत्रात काही प्रमाणात ईस्ट बंगालने हैदराबाद एफसीवर वर्चस्व ठेवले. काँगो प्रजासत्ताकच्या जॅकीस माघेमाने पूर्वार्धात केलेल्या गोलच्या जोरावर ईस्ट बंगालने मध्यंतरास आघाडी घेतली होती. त्यानंतर स्पेनचा 33 वर्षीय स्ट्रायकर आरीदाने सांतानाने एका मिनिटात दोन गोल करून हैदराबादला आघाडी मिळवून दिली. हालीचयर नर्झारीने गोल करून हैदराबादची आघाडी 3-1 अशी वाढविली तर सामना संपण्यास नऊ मिनिटे शिल्लक असताना जॅकीस माघोमाने आपला वैयक्तिक दुसरा गोल केला.
ईस्ट बंगालला आपल्या पाचव्या सामन्यात चौथ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. पहिले तीन सामने हरल्यानंतर जमशेदपूरला बरोबरीत रोखून ईस्ट बंगालने आशा निर्माण केल्या होत्या, पण खाते उघडून आणि मध्यंतरास आघाडी असूनही त्यांना अखेरीस रिकाम्या हाताने मैदान सोडावे लागले.
सामन्याच्या 26व्या मिनिटाला अँथनी पिल्कींगटन आणि मॅट्टी स्टेनमन यांनी रचलेल्या चालीवर माघोमाने मारलेला ताकदवान फटका हैदराबादचा गोलरक्षक सुब्रोतो पॉलच्या हाताला लागून नेटमध्ये गेला. त्यानंतर हैदराबादला बरोबरी साधण्याची संधी मिळाली होती. त्यांना पॅनल्टी फटका मध्यंतराच्या ठोक्याला मिळाला होता. मात्र आरीदानेने मारलेली पॅनल्टी मजुमदारने आपल्या उजव्या बाजूने झेपावत अडविली. 56व्या मिनिटाला महम्मद यासीरने घेतलेल्या फ्रिकीकवर आरीदानेने हेडरवर मजुमदारला भेदले आणि हैदराबादचा बरोबरीचा गोल केला.
या गोलनंतर काही क्षणांत यासीर आणि लिस्टन कुलासाने केलेल्या चालीवर आरीदाने सांतानाने शानदार फिनिशिंग करताना मजुमदारला भेदले आणि आघाडी 2-1 अशी केली. त्यानंतर 68व्या मिनिटाला लिस्टन कुलासोने दिलेल्या पासवर हालीचरण नर्झारीने हैदराबादचा तिसरा गोल केला तर 81 व्या मिनिटाला माघोमाने ईस्ट बंगालच्या दुसऱया गोलची नोंद केली.