वृत्तसंस्था/ जकार्ता
2027 मध्ये होणाऱया आशियाई चषक स्पर्धेच्या यजमानपदाची निवड प्रक्रिया कोरोना महामारीमुळे लांबणीवर टाकण्यात आली असून 2022 मध्ये त्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने (एएफसी) बुधवारी जाहीर केले.
यावर्षी 27 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेच्या यजमानपदाची निवड एएफसी काँग्रेसमध्ये केली जाणार होती. आशिया विभागातील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या आयोजनासाठी भारतासह इराण, कतार व सौदी अरेबिया इच्छुक आहेत. ‘या स्पर्धेच्या आयोजनास जे देश इच्छुक आहेत, प्रवासावरील निर्बंधामुळे त्या देशात जाऊन संयोजन समिती इन्स्पेक्शन करू शकणार नाही. यजमानपद घोषित करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे 2027 मधील स्पर्धेच्या यजमानपदाची निवड येत्या नोव्हेंबरऐवजी 2022 मध्ये करण्याचे ठरविण्यात आले आहे,’ असे एएफसी कार्यकारी समितीने स्पष्ट केले.