तिसऱया दिवसअखेर इंग्लंड 2 बाद 220, रुट-मलान यांची शतकाकडे वाटचाल
ब्रिस्बेन / वृत्तसंस्था
जो रुट (नाबाद 86) व डेव्हिड मलान (नाबाद 80) यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या ऍशेस कसोटी सामन्याच्या तिसऱया दिवशी 70 षटकात 2 बाद 220 धावांपर्यंत मजल मारली. शुक्रवारी दिवसाचा खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी रुट व मलान शतकाच्या उंबरठय़ावर पोहोचले होते. या कसोटीत इंग्लंडचा संघ अद्याप 58 धावांनी पिछाडीवर आहे.
या प्रतिष्ठेच्या मालिकेत इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 147 धावांमध्ये गुंडाळला जाणे धक्कादायक ठरले होते. त्यातच, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 425 धावांचा डोंगर रचत डावाअखेर 278 धावांची भरभक्कम आघाडी घेतली होती. पण, रुट व मलान या जोडीने इंग्लंडला दुसऱया डावात 2 बाद 61 वरुन दिवसअखेर 2 बाद 220 अशा भक्कम स्थितीत आणले.
जो रुटने 158 चेंडूंचा सामना करत 10 चौकार फटकावले आणि ऑस्ट्रेलियन भूमीतील ऍशेस कसोटीत आपल्या मागील सर्वोच्च धावांचा विक्रम मागे टाकण्यासाठी केवळ एका धावेच्या अंतरावर पोहोचला. रुटला उत्तम साथ देत मलानने देखील 177 चेंडूंचा सामना करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सातत्याने सतावत ठेवले. रुट व मलान या जोडीनेच जवळपास शेवटची दोन्ही सत्रे पूर्ण खेळून काढली.
इंग्लंडला सामन्यातील आव्हान कायम राखण्यासाठी सर्वप्रथम पहिला डाव विसरावा लागेल, असे नाबाद अर्धशतकवीर डेव्हिड मलान याप्रसंगी म्हणाला. सध्या संघाने फक्त 50 टक्के उत्तम खेळ साकारला असून अद्याप बरेच काही बाकी आहे, याचा त्याने येथे उल्लेख केला. ऑस्ट्रेलियावर दडपण आणायचे असेल तर आपल्याला आणखी किमान 250 ते 300 धावा जमवाव्या लागतील, असे तो म्हणाला.
शुक्रवारी, दिवसाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियाने 7 बाद 343 धावांवरुन डावाला पुढे प्रारंभ करत यात आणखी 82 धावांची भर घातली. ट्रव्हिस हेडला 152 धावांवर मार्क वूडने शेवटच्या गडय़ाच्या रुपाने बाद केले. ऑस्ट्रेलियाचा डाव 425 धावांमध्ये संपुष्टात आला. शतकवीर ट्रव्हिस हेडने स्टार्कसमवेत (35) आठव्या गडय़ासाठी 85 तर नॅथन लियॉनसमवेत (15) नवव्या गडय़ासाठी 29 धावांची भागीदारी साकारली. हेडने डावखुरा फिरकीपटू जॅक लीचला चौकार फटकावत आपले शतक थाटात साजरे केले. त्याच्या खेळीत 15 चौकार व 4 षटकारांचा समावेश राहिला. लीचला 13 षटकात एका गडय़ाच्या बदल्यात 102 धावा मोजाव्या लागल्या. वूडने मात्र 85 धावात तिहेरी यश मिळवले. ऑलि रॉबिन्सनने 58 धावात 3 तर वोक्सने 76 धावात 2 फलंदाज बाद केले. मार्चनंतर पहिलीच कसोटी खेळत असलेल्या स्टोक्सला (12 षटकात 0-65) बरेच झगडावे लागत असल्याचे येथे दिसून आले.
चौथ्या डावात पहिल्या सत्राअखेर इंग्लिश सलामीवीरांनी बिनबाद 23 अशी सावध सुरुवात केली. पण, उपाहारानंतर रोरी बर्न्स कमिन्सच्या गोलंदाजीवर यष्टीमागे कॅरेकरवी झेलबाद झाला. हसीब हमीदने स्टार्कच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल देण्यापूर्वी 27 धावांचे योगदान दिले. त्याने 58 चेंडू खेळले. त्यानंतर रुट व मलान यांनी आणखी पडझड होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेतली.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 147.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः डेव्हिड वॉर्नर झे. स्टोक्स, गो. रॉबिन्सन 94 (176 चेंडूत 11 चौकार, 2 षटकार), मार्कस हॅरिस झे. मलान, गो. रॉबिन्सन 3 (17 चेंडू), मार्नस लाबुशाने झे. वूड, गो. लीच 74 (117 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), स्टीव्ह स्मिथ झे. बटलर, गो. वूड 12 (19 चेंडूत 2 चौकार), ट्रव्हिस हेड त्रि. गो. वूड 152 (148 चेंडूत 14 चौकार, 4 षटकार), कॅमेरुन ग्रीन त्रि. गो. रॉबिन्सन 0 (1 चेंडू), ऍलेक्स कॅरे झे. पोप, गो. वोक्स 12 (32 चेंडूत 1 चौकार), पॅट कमिन्स झे. हमीद, गो. रुट 12 (27 चेंडू), मिशेल स्टार्क झे. बर्न्स, गो. वोक्स 35 (64 चेंडूत 5 चौकार), नॅथन लियॉन झे. रॉबिन्सन, गो. वूड 15 (24 चेंडूत 2 चौकार), जोश हॅझलवूड नाबाद 0 (6 चेंडू). अवांतर 16. एकूण 104.3 षटकात सर्वबाद 425.
गडी बाद होण्याचा क्रम
1-10 (हॅरिस, 5.2), 2-166 (लाबुशाने, 47.2), 3-189 (स्मिथ, 52.6), 4-195 (वॉर्नर, 55.2), 5-195 (ग्रीन, 55.3), 6-236 (कॅरे, 64.4), 7-306 (कमिन्स, 75.6), 8-391 (स्टार्क, 95.6), 9-420 (लियॉन, 102.3), 10-425 (हेड, 104.3).
गोलंदाजी
ख्रिस वोक्स 25-8-76-2, ऑलि रॉबिन्सन 23-8-58-3, मार्क वूड 25.3-4-85-3, बेन स्टोक्स 12-0-65-0, जॅक लीच 13-0-102-1, जो रुट 6-0-29-1.
इंग्लंड दुसरा डाव ः हसीब हमीद झे. कॅरे, गो. स्टार्क 27 (58 चेंडूत 4 चौकार), रोरी बर्न्स झे. कॅरे, गो. कमिन्स 13 (27 चेंडूत 2 चौकार), डेव्हिड मलान खेळत आहे 80 (177 चेंडूत 10 चौकार), जो रुट खेळत आहे 86 (158 चेंडूत 10 चौकार). अवांतर 14. एकूण 70 षटकात 2 बाद 220.
गडी बाद होण्याचा क्रम
1-23 (बर्न्स, 8.6), 2-61 (हसीब, 20.6).
गोलंदाजी
मिशेल स्टार्क 14-2-60-1, जोश हॅझलवूड 8-4-13-0, पॅट कमिन्स 14-4-43-1, नॅथन लियॉन 24-4-69-0, कॅमेरुन ग्रीन 7-2-12-0, मार्नस लाबुशाने 3-0-14-0.
जो रुटचा इंग्लंडतर्फे कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावांचा विक्रम
इंग्लिश कर्णधार जो रुटने या कॅलेंडर वर्षात 1541 धावा जमवल्या असून मायकल वॉनचा 1481 धावांचा विक्रम त्याने येथे मोडीत काढला. वॉनने 2002 साली हा विक्रम केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा मोहम्मद युसूफचा विक्रम अद्यापही अबाधित आहे. युसूफने 2006 मध्ये 11 सामन्यात 1788 धावांची आतषबाजी केली होती.
इंग्लंडला ती अपयशी श्रृंखला मोडीत काढता येणार का?
इंग्लंडने ऑस्ट्रेलियन भूमीत मागील दशकभराच्या कालावधीत अगदी एकही कसोटी जिंकलेली नाही. शिवाय, 1986 नंतर ते गब्बावर देखील एकही कसोटी जिंकू शकलेले नाहीत. या मालिकेत येथे तरी ती अपयशी श्रृंखला मोडीत काढण्यात इंग्लंडला यश येईल का, हे येत्या दोन दिवसांच्या खेळात स्पष्ट होईल. आज या सामन्याचा चौथा दिवस असणार आहे.