फ्रान्समधील धक्कादायक घटना : फेसबुकवर मृत्यू कवटाळतानाचे दृश्य प्रसारित : अन्नाचा त्याग करण्याचे पाऊल
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सच्या डीजोन शहरातील 57 वर्षीय अलाइन कोक हे एका असाध्य रोगाने ग्रस्त आहेत. उपचार नसल्याने त्यांनी अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडे इच्छामृत्यूला अनुमती देण्याची मागणी केली होती. परंतु अध्यक्षांनी कोक यांची ही मागणी फेटाळली होती. या नकारामुळे कोक यांना अन्नत्याग केला असून शनिवार सकाळपासून फेसबुकवर स्वतःच्या मृत्यूचे लाइव्ह स्ट्रीमिंगही सुरू केले आहे.
1 आठवडय़ापेक्षा अधिक काळ मी जगणार नाही. वेळ निघून जाण्यासह अस्वस्थता वाढत असल्याचे कोक यांनी म्हटले आहे. असाध्य रोगाने त्रस्त असून सहन न होणाऱया वेदनांपासून मुक्ती मिळावी याकरता इच्छामृत्यूची परवानगी दिली जावी, असे कोक यांनी अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते. परंतु अध्यक्ष मॅक्रॉन यांनी त्यांना समजावत इच्छामृत्यूची परवानगी देण्यास नकार दिला होता. फ्रान्सच्या कायद्यानुसार मला याची अनुमती नाही आणि मी कायद्यापेक्षा मोठा नाही. याच कारणामुळे तुमची मागणी मान्य करू शकत नसल्याचे मॅक्रॉन त्यांनी कोक यांना कळविले होते.
अध्यक्षांकडून नकार मिळाल्यावर कोक यांनी मृत्यूचे लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याची घोषणा करत शनिवारपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू केली आहे. स्वतःच्या मृत्यूच्या लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे लोकांमध्ये जागरुकता निर्माण करू इच्छितो. आजारांशी झगडणाऱया लोकांना त्रासातून बाहेर काढत त्यांना इच्छामृत्यूची अनुमती मिळवून देऊ पाहत असल्याचे कोक यांनी म्हटले आहे.
इच्छामृत्यूची अनुमती नसलेल्या युरोपीय देशांमध्ये फ्रान्स सामील आहे. 2016 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या एका कायद्यानुसार स्वतःच्या अंतिम क्षणांदरम्यान रुग्णांना इच्छामृत्यू दिला जात नाही, परंतु अशा रुग्णांना केवळ बेशुद्ध करून ठेवले जाऊ शकते.
कोक मागील 34 वर्षांपासून असाध्य आजाराने त्रस्त आहेत. आजारामुळे त्यांना बिछान्यावरच पडून रहावे लागते. स्वतःचा मृत्यू स्मरणीय करू पाहतोय, माझा मृत्यू पूर्ण जगाने लक्षात ठेवावा अशी इच्छा आहे. माझ्या कृतीमुळे फ्रान्सच्या कायद्यात बदल करण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते असे कोक यांनी म्हटले आहे.