प्रतिनिधी / सातारा :
ईडी ही स्वायत्त संस्था आहे. ती निःपक्षपातीपणे काम करते, अशी प्रतिक्रिया भजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला पाठवलेल्या ईडीच्या नोटीसीच्या प्रश्नावर दिली. दरम्यान, त्यांनी आयोद्या फौंडेशनच्यावतीने चालवलेल्या कोविड सेंटरला भेट देवून नगरसेवक विजय काटवटे हे एक चांगले काम करत आहेत. लवकरात लवकर कोरोना संपावा, अशा प्रकारच्या कोविड सेंटरची गरज भासू नये, असेही मत व्यक्त केले.
मंगळवार पेठेतल्या कात्रेवाडा शाळेत अयोद्या फौंडेशनच्यावतीने नगरसेवक विजय काटवटे यांनी सुरु केलेल्या कोविड सेंटरला अचानक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. त्यांनी सुरु केलेल्या या कोविड सेंटरबाबत नगरसेवक विजय काटवटे यांचे कौतुक करत या सेंटरमधून रुग्णांना कशा पद्धतीने उपचार दिले जातात, किती रुग्ण बरे झाले याची माहिती त्यांनी घेतली. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, दत्ताजी थोरात, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल बलशेठवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अयोद्या फौंडेशनच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या या कोरोना केअर सेंटरचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. नगरसेवक विजय काटवटे सर्वांच्या सहकार्याने कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत आहेत. लवकरच हा कोरोना जावो आणि अशा प्रकारच्या कोरोना सेंटरची गरज भासू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, त्यांना जिल्हा बँकेला आलेल्या ईडीच्या नोटीसीबाबत छेडले असता त्यांनी ईडी ही स्वायत्त संस्था आहे. ती निःपक्षपातीपणे काम करते, असे त्यांनी निक्षून सांगितले.